सातारा प्रतिनिधी
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्यावतीने महाआवास अभियानांतर्गत पंतप्रधान आवास योजना (ग्रामीण) टप्पा २ मध्ये तालुक्यातून सर्वात जास्त घरकुल मंजुरी दिलेल्या ग्रामपंचायतीच्या ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.
प्रत्येक तालुक्यातून एक अशा ११ ग्रामपंचायत अधिकारी आणि तीन तांत्रिक सहाय्यक व तीन डेट्रा इंट्री ऑपरेटर यांनाही गौरवण्यात आले.
जिल्ह्यात ४५ हजारांहून अधिक घरकुलांचे दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी याशनी नागराजन, विश्वास सिद यांनी नियमित आढावा घेऊन मुदतीत घरकूल मंजुरीची प्रक्रिया पूर्ण करण्याबरोबरच शंभर दिवसात घरकूल मंजुरी आदेश व पहिला हप्ता जमा करण्याचे नियोजन करण्यात आले. त्यानुसार जिल्ह्याचे काम राज्यात अग्रेसर राहिले आहे.
जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृहत झालेल्या कार्यक्रमात आलेवाडीचे (ता. जावली) चंद्रकांत कोळी, चोरेचे (ता. कराड) गफूर आतार, भादेचे (ता. खंडाळा) सुनील धायगुडे, गुरसाळेचे (ता. खटाव) हणमंत फडतरे, पिंपोडे बुद्रुकचे (ता. कोरेगाव) सूर्यकांत कांबळे, भेकवलीचे (ता. महाबळेश्वर) निनाद पवार, गोंदवले बुद्रुकचे (ता. माण) अमोल पवार, किल्ले मोरगिरीचे (ता. पाटण) चंद्रवदन साळुंखे, विडणीचे (ता. फलटण) अंकुश टेंबरे, कामथी तर्फ साताराच्या रोहिणी पवार, कोंढावळेचे (ता. वाई) जयंत भिसे या ग्रामपंचायत अधिकाऱ्यांचा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक विश्वास सिद, उपमुख्य कार्यकारी अधिकारी निलेश घुले आदींच्या उपस्थितीत गौरव करण्यात आला.
अकुशल मंजुरी लाभ उपलब्ध करून देण्यात उल्लेखनीय काम केलेल्या तांत्रिक सहाय्यक नितीन यादव (कराड), गणेश कोळी (पाटण), प्रितम पवार (माण) व घरकुल मंजुरी, हप्ते वितरणामध्ये उल्लेखनीय काम केलेल्या डाटा एन्ट्री ऑपरेटर संदेश कदम (कराड), अक्षय चांदेकर (कोरेगाव) व प्रितम ओंबळे (वाई) यांचाही गौरव करण्यात आला.


