सातारा प्रतिनिधी
सातारा शहरात असलेल्या तब्बल साठ वर्षे जुन्या बसस्थानकाची पुनर्बांधणी लवकरच होणार आहे. पुढील दोन महिन्यांत एसटी बसस्थानकाचे बांधकाम सुरू होणार असून, नव्या रचनेत १८ ते २० प्लॅटफॉर्म उभारले जाणार असल्याची
माहिती विभाग नियंत्रक पलंगे यांनी दिली.
त्यासाठी १५ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. नव्याने बस स्थानक उभारल्यानंतर प्रवाशांची वाढती कोंडी कमी होणार आहे.
जुने बसस्थानक पाडल्यानंतर तात्पुरत्या स्वरूपात एसटी बसला ये- जा करण्यासाठी प्रशासनाने शहरातील तीन जागांचा पर्याय निवडला असून, लवकरच जागा अंतिम होणार आहे. दरम्यान, साताऱ्यातील मुख्य बस स्थानकालगत असणाऱ्या विभागीय वर्कशॉपही नव्याने उभारण्यात येणार असून, त्यासाठी १८ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील पाच ठिकाणी बस स्टॅंडचेही नूतनीकरण होणार आहे.
तात्पुरत्या बसस्थानकासाठी तीन पर्याय
– पोलिस ग्राउंड व प्रशासकीय इमारत यामधील रिकामी जागा
– पशुसंवर्धन गोडोली येथील जागा
– एमआयडीसीमधील मोकळी जागा
पाच बसस्थानकांची बांधणी व निधी
महाबळेश्वर : १५ कोटी
वाई : १२ कोटी ६५ लाख
पाचगणी : चार कोटी ५५ लाख
पारगाव : चार कोटी
मरळी : एक कोटी ६८ लाख (नव्याने उभारणार)
चार्जिंग स्टेशन जागेवरच
मागील चार महिन्यांपूर्वी सातारा मुख्य बसस्थानकात इलेक्ट्रिक बस चार्जिंग करण्यासाठी चार्जिंग स्टेशन उभी करण्यात आली आहेत.
नव्याने बसस्थानकाचे काम सुरू झाल्यानंतरही इलेक्ट्रिक बसचे चार्जिंग त्याच ठिकाणी होणार आहे. या बस चार्जिंग करून पुन्हा ज्या पर्यायी जागेत तात्पुरते बसस्थानक होणार आहे. त्या ठिकाणी प्रवाशांची ने-आण करण्यासाठी जाणार असल्याची माहिती एसटीच्या विभागीय स्थापत्य अभियंता प्रियांका काशीद यांनी दिली.
स्थानक शहराबाहेर गेल्यास व्यावसायिकांना फटका
जुने बसस्थानक पाडून नव्याने त्याच ठिकाणी उभारण्यात येणार आहे. मात्र, या कामाला किमान दोन वर्षे लागणार असल्याने पर्यायी जागेत उभारण्यात येणारे बसस्थानक शहरातच असावे, असा आग्रह एसटी प्रशासनासह सर्वसामान्य प्रवाशांचा आहे. हे बसस्थानक शहराबाहेर गेल्यास प्रवाशांना पुन्हा शहरात येण्यासाठी पैसे खर्च करावे लागणार आहेत. व्यावसायिकांनाही फटका बसणार आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने एसटीला मध्यवर्ती ठिकाणी जागा देणे गरजेचे आहे.
शहरातील मध्यवर्ती ठिकाणी उभारण्यात येणाऱ्या बसस्थानकासाठी १५ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. त्यासाठी पर्यायी जागा उपलब्ध झाल्यानंतर त्या ठिकाणी तात्पुरते बससाठी शेड उभारल्यानंतर जुने बस स्थानक पाडले जाणार आहे. याचबरोबर जिल्ह्याचे वर्कशॉपचे काम सुरू होणार असून, त्यासाठी १८ कोटींचा निधी उपलब्ध झाला असल्याची माहिती विभाग नियंत्रक रोहन पलंगे यांनी दिली.


