मुंबई प्रतिनिधी
मुंबई : वांद्रे पूर्व येथील कलानगर परिसरातील रस्त्यालगत असलेल्या एका वस्तीत आज सकाळी ८ फूट लांबीचा अजगर आढळल्याने नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली. मानवी वस्तीत महाकाय साप आल्याची माहिती समजताच स्थानिकांनी तत्काळ घाबरून न जाता सतर्कता दाखवत सर्पमित्र अतुल कांबळे आणि पोलीस सर्पमित्र सचिन मोरे यांना याची माहिती दिली.
माहिती मिळताच सर्पमित्र अतुल कांबळे यांनी तातडीने अंधेरी राऊंड हद्दीतील वांद्रे राऊंडचे राऊंड ऑफिसर दीपक गायकवाड तसेच मुंबई रेंज कंट्रोल रूमला घटनेची माहिती दिली आणि ते सहकाऱ्यांसह तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.
घटनास्थळी पोहोचल्यानंतर नागरिकांनी अजगर घरांच्या आसपास फिरत असल्याचा व्हिडिओ दाखवला. स्थानिकांची गर्दी आणि कुत्र्यांच्या सततच्या भुंकण्यामुळे प्रचंड घाबरलेला हा अजगर जवळच असलेल्या एका लोखंडी स्पेयर लाईटच्या पाईपसदृश खांब्यात जाऊन बसला होता.
अजगराला कोणतीही इजा होऊ नये आणि रेस्क्यू ऑपरेशन सुरक्षितपणे पार पाडावे, यासाठी अत्यंत काळजीपूर्वक तो लोखंडी खांब मोकळ्या जागेत हलवण्यात आला. त्यानंतर, पाईपमध्ये अडकलेल्या अजगराला सुखरूप बाहेर काढण्यासाठी तब्बल दीड ते दोन तास प्रयत्न करावे लागले. अखेर, पोलीस सर्पमित्र सचिन मोरे आणि अतुल कांबळे यांनी आपल्या कौशल्याचा व अनुभवाचा वापर करत अजगराला अत्यंत सावधगिरीने त्या लोखंडी खांब्यातून बाहेर काढले. अजगर सुरक्षितपणे बाहेर येताच उपस्थितांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
विशेष म्हणजे, याच परिसरात मागील महिन्यात ११ फूट लांबीच्या एका अजगराने मांजरीला वेटोळे घालून ठार केल्याची थरारक घटना घडली होती. या आधीच्या घटनेमुळे कलानगर परिसरातील नागरिकांमध्ये आधीच भीतीचे वातावरण होते. आजच्या यशस्वी रेस्क्यूमुळे नागरिकांच्या जिवात जीव आला असून, त्यांनी सर्पमित्र अतुल कांबळे व सचिन मोरे यांचे मनापासून आभार मानले आहेत.
रेस्क्यू करण्यात आलेला हा जीव अंदाजे ८ फूट लांबीचा ‘इंडियन राॅक पायथन’ (Indian Rock Python) असून हा एक बिनविषारी साप आहे. हा साप भारतातील सर्वात मोठ्या बिनविषारी सापांपैकी एक मानला जातो. सध्या या अजगराला वन विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आणि नियमांचे पालन करत त्याच्या मूळ नैसर्गिक अधिवासात सुरक्षितपणे मुक्त करण्यात येणार आहे.


