मुंबई प्रतिनिधी
मुंबई : छत्रपती शिवाजी पार्कात परवानगी नाकारल्यानंतरही आंदोलन केल्याप्रकरणी कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांच्यासह सुमारे ५०० आंदोलकांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. २ ऑक्टोबर रोजी सायंकाळी शिवाजी पार्क परिसरात झालेल्या आंदोलनानंतर ही कारवाई करण्यात आली. त्यामुळे आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या दिपके यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
कॉक्रोच जनता पार्टीच्या वतीने २ ऑक्टोबर रोजी छत्रपती शिवाजी पार्क परिसरात आंदोलन आणि जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. या आंदोलनासाठी देशभरातून तरुण मुंबईत दाखल झाल्याचा दावा करण्यात आला होता. आंदोलनाला काही सेलिब्रिटींचीही उपस्थिती होती. मात्र, शिवाजी पार्क परिसरातील स्थानिकांकडून या आंदोलनाला विरोध करण्यात आला होता. आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारल्याचेही समोर आले होते.
परवानगी नसतानाही आंदोलन; पोलिसांचा आरोप
पोलिसांच्या माहितीनुसार, २ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४ ते ७ या वेळेत विनापरवाना जमाव जमवून सभा घेण्यात आली. यावेळी घोषणाबाजी तसेच ध्वनिक्षेपकाचा वापर करण्यात आल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे. सार्वजनिक रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याने वाहतूक आणि नागरिकांच्या दैनंदिन हालचालींना अडथळा निर्माण झाल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी भारतीय न्याय संहितेतील कलम १८९(२), २२३ तसेच महाराष्ट्र पोलीस कायद्यातील कलम ३७(१), ३७(३) आणि १३५ अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात पोलिसांकडून सरकारतर्फे कायदेशीर फिर्याद दाखल करण्यात आली आहे.
दिपके यांच्यासह प्रमुख आयोजक आरोपी
या प्रकरणातील आरोपींमध्ये अभिजीत दिपके यांच्यासह अजिंक्य शिंदे, प्रणय अहिरे, आशुतोष रांका, सौरभ दास, आफरीन नवाज, सोम्या कोरडे, अंकित भारद्वाज, विजय मळगी आणि योगेश इंगळे यांचा समावेश असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. आंदोलनात सहभागी झालेल्या सुमारे ५०० जणांविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सभेतून सत्ताधाऱ्यांवर टीका
आंदोलनादरम्यान अभिजीत दिपके यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली. निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही त्यांनी निशाणा साधला. निवडणूक प्रक्रियेशी संबंधित विविध मुद्द्यांवर आंदोलकांनी घोषणाबाजी केली.
शिवाजी पार्क परिसरातील काही स्थानिकांनी आंदोलनाला विरोध केला होता. मात्र, आंदोलनाला विरोध करणारे नागरिक नसून भाजपशी संबंधित पदाधिकारी असल्याचा आरोप दिपके यांनी केला होता. या आरोपामुळे आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राजकीय वादही निर्माण झाला.
वकिलांकडूनही पोलिसांत तक्रार
दरम्यान, वकील सिद्धी देवळेकर यांनीही अभिजीत दिपके यांच्याविरोधात पोलिसांकडे तक्रार केली होती. परवानगी नसताना आंदोलन केल्यामुळे परिसरातील शांतता आणि नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम झाल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
छत्रपती शिवाजी पार्कच्या वापराबाबत मुंबई उच्च न्यायालयाने २०१३ मध्ये दिलेल्या एका निकालाचाही संदर्भ या तक्रारीत देण्यात आला आहे. शिवाजी पार्कमध्ये आंदोलन आणि सार्वजनिक कार्यक्रमांच्या आयोजनाबाबत न्यायालयीन निर्बंध असल्याचा दावा तक्रारदारांनी केला आहे.
पुढील कारवाईकडे लक्ष
पोलिसांनी आता गुन्हा दाखल केल्यानंतर या प्रकरणातील पुढील तपासाला सुरुवात केली आहे. आंदोलनाचे आयोजक, सहभागी आंदोलक, परवानगीसंदर्भातील कागदपत्रे तसेच कार्यक्रमादरम्यान झालेल्या घोषणाबाजी आणि ध्वनिक्षेपकाच्या वापराबाबत पोलिसांकडून माहिती घेतली जात आहे. त्यामुळे या प्रकरणात पुढे कोणती कायदेशीर कारवाई होते, याकडे लक्ष लागले आहे.


