
सातारा प्रतिनिधी
भारतीय जनता पक्षाने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि प्रशासनासह लोक समन्वयाचे संतुलन साधण्याकरता ज्या जिल्ह्यात पालकमंत्री भाजपचा नाही त्या जिल्ह्यात संपर्कमंत्र्यांची नेमणूक आज केली.
त्यात सातारा जिल्ह्याच्या संपर्कमंत्रिपदी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले तर धाराशिव जिल्ह्याच्या संपर्कमंत्रिपदी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची वर्णी लागली आहे. याबाबतची अधिकृत घोषणा प्रदेश कार्यकारिणीच्यावतीने करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
भाजपने महाराष्ट्रात प्रशासन आणि विकास कामांच्या प्रसारासाठी लोक समन्वयाची रणनीती आखली आहे. याचा फायदा आगामी नगरपालिका, जिल्हा परिषद व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये होणार आहे. राज्यात महायुतीचे सरकार आहे यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार), शिवसेना शिंदे गट व भारतीय जनता पक्ष यांचा सहभाग आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जास्तीत जास्त जागा आपल्या पक्षाला कशा मिळतील याकरिता रस्सीखेच नक्कीच राहणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर वरचष्मा ठेवणे तसेच जिल्ह्यात भाजपच्या सदस्यांची कामे प्रशासनापर्यंत पोहोचणे, प्रशासनाकडून त्यांना योग्य तो सकारात्मक प्रतिसाद मिळवणे याकरिता प्रदेश कार्यकारिणीने संपर्कमंत्र्यांचे नियोजन केले आहे. ज्या जिल्ह्यांमध्ये भाजपचा पालकमंत्री नाही त्या जिल्ह्यामध्ये हे नियोजन करण्यात आले आहे.
भाजपच्या कार्यकर्त्यांना आपली कामे मंत्रालयाच्या माध्यमातून होण्याकरता एक संपर्क दुवा म्हणून संपर्कमंत्र्यांची जबाबदारी राहणार आहे. यामध्ये विकास कामांचे प्रस्ताव कार्यकारिणी सदस्यांचा आढावा याशिवाय निधी वितरण आणि इतर संघटनात्मक बांधणीच्या प्रश्नांवर संपर्क मंत्री कार्यकारिणी सदस्यांशी चर्चा करणार आहेत. त्यानुसार सातारा जिल्ह्याचे संपर्क मंत्री म्हणून सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले तर ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे धाराशिव जिल्ह्याचे संपर्कमंत्री म्हणून निवड करण्यात आली आहे. सातारा जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदासाठी चुरस होती शिवेंद्रसिंहराजे यांची पालकमंत्रिपदी वर्णी लागेल अशी चर्चा होती.
प्रत्यक्षात शिवसेनेचे शंभूराज देसाई यांची पालकमंत्री म्हणून वर्णी लागली. जिल्ह्यातील भाजपचे कार्यकर्ते, संघटनात्मक पदाधिकारी संपर्कमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या संपर्कात राहतील. राज्य शासन व स्थानिक कार्यकर्ते यांच्यातील संपर्क माध्यम म्हणून शिवेंद्रसिंहराजे यांची मोठी जबाबदारी राहणार आहे. त्याच पद्धतीची जबाबदारी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेसुद्धा राशिव जिल्ह्यात पार पाडतील, असा विश्वास सूत्रांनी व्यक्त केला.