
सातारा प्रतिनिधी
महाराष्ट्राच्या पर्यटन नकाशावर लवकरच “नवीन महाबळेश्वर” नावाचे नवे ठिकाण झळकणार आहे. प्रसिद्ध महाबळेश्वरच्या शेजारीच हे नवीन पर्यटनस्थळ उभारण्यात येणार असून, यासाठी 529 गावांचा समावेश करण्यात आला आहे.
तसेच, 2097 चौरस किलोमीटर क्षेत्रफळावर हे निसर्गरम्य गिरीस्थान वसवले जाणार आहे.
राज्य सरकारने सातारा, पाटण, जावळी आणि महाबळेश्वर तालुक्यातील गावांना या प्रकल्पात सामील करण्याचा निर्णय घेतला आहे. या ठिकाणी रोपवे, घाटमाथा रेल्वे, सायकल ट्रॅक आणि फ्युनिक्युलर रेल्वे अशा अत्याधुनिक सुविधा उभारण्यात येणार आहेत. त्यामुळे पर्यटकांना अत्याधुनिक आणि निसर्गरम्य पर्यटनाचा आनंद घेता येणार आहे.
महाबळेश्वर आणि पाचगणी परिसरात पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे वाढता ताण लक्षात घेऊन “नवीन महाबळेश्वर” स्थळ विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने या प्रकल्पासाठी 294 नवीन गावांचा समावेश करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे सादर केला आहे.
सह्याद्रीच्या कुशीत पर्यावरणपूरक पर्यटन
हे नवे पर्यटनस्थळ सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये, समुद्रसपाटीपासून 1200 मीटर उंचीवर वसवले जाणार आहे. येथेसोळशी, उरमोडी आणि कांदाटी या उपनद्यांचा प्रवाह आहे. घनदाट जंगल, वन्यजीव, धबधबे, तलाव आणि ऐतिहासिक वास्तूंचा वारसा असल्याने पर्यावरणपूरक पर्यटनासाठी ही योग्य जागा मानली जाते. पर्यावरण प्रेमींची शाश्वत पर्यटनासाठी मागणी आहे. या प्रकल्पाच्या अनुषंगाने स्थानिक नागरिक, पर्यावरण प्रेमी आणि सामाजिक कार्यकर्त्यांसोबत सरकारने चर्चा केली आहे.
निसर्गाला धक्का न लावता शाश्वत पर्यटनावर भर
“पर्यावरणपूरक विकासाला प्राधान्य दिल्यास हा प्रकल्प देशातील एक उत्तम गिरीस्थान ठरू शकतो,” असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून विशेष लक्ष उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिकाऱ्यांसोबत बैठका घेऊन या प्रकल्पावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. या भागातील पर्यटनाचा विकास होण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MMRDA) विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून काम पाहणार आहे.
पर्यटनाच्या नव्या युगाची सुरुवात
नवीन महाबळेश्वर प्रकल्पामुळे महाराष्ट्रातील पर्यटनाला नवीन ओळख आणि जागतिक स्तरावर नावलौकिक मिळण्याची शक्यता आहे.
हा प्रकल्प राज्याच्या आर्थिक विकासातही मोठा हातभार लावणार आहे. “सह्याद्रीच्या कुशीत नव्या पर्यटनस्थळाचा उदय” ही महाराष्ट्राच्या पर्यटन क्षेत्रासाठी मोठी संधी ठरणार आहे!