
सातारा प्रतिनिधी
सातारा:जिल्हा अधिक्षक भूमी अभिलेख यांच्या अध्यक्षतेखाली व श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत वांग, तारळी व उरमोडी प्रकल्पग्रस्तांच्या अडचणीबाबतीत बैठक आयोजित करण्यात आली होती, या बैठकीमध्ये त्यांनी संबंधित उपअधीक्षक भूमी अभिलेख यांना निर्देश दिले.
अप्पर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ठरल्याप्रमाणे ही बैठक घेण्यात आली होती, या बैठकीत प्रकल्पग्रस्त गावठाणांच्या हद्दी निश्चित करुन, गावठाणांचे कमी जास्त पत्रक करणे, प्लॉटचे सातबारा रद्द करून प्रॉपर्टी कार्ड बनविणे, गावठाण व सर्व नागरी सुविधा जिल्हा परिषदेकडे हस्तांतरित करणार, आणि प्रकल्पग्रस्तांना वाटप करण्यात आलेल्या जमिनींचे कमी जास्त पत्रक करून नकाशे वेगळे करणे, आणि प्रकल्पग्रस्तांचे विविध प्रलंबित असलेले प्रश्न लवकरात लवकर सोडविणे असे निर्णय घेण्यात आले.
या बैठकीस उपअधीक्षक भूमी अभिलेख, सातारा, कराड, पाटण, माण, खटाव आणि तारळी, वांग व उरमोडी प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी, भूमी संपादन अधिकारी उपस्थित होते.
यावेळी डॉ. भारत पाटणकर म्हणाले की, जिल्हा अधिक्षक भूमी अभिलेख हे प्रकल्पग्रस्तांच्या बाबतीत अतिशय सकारात्मक असून त्यांच्या कक्षेत असणारे सर्व संबंधित प्रश्न विनाविलंब सोडवण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. त्यांनी तसे आदेश संबंधितांना दिले आहेत.
याचबरोबर प्रकल्पग्रस्तांना केंद्र सरकारच्या २०१३ व राज्य सरकारच्या २०१४ च्या राजपत्रानुसार इंदीरा आवास प्रमाणे घरबांधणी अनुदान देण्याच्या आमच्या मागणीप्रमाणे कोल्हापूर जिल्ह्यातील चांदोली अभयारण्यग्रस्तांना वाटप सुरू झाले असून, २०१४ पूर्वी ज्यांनी अंशतः अनुदान घेतले आहे, त्याबाबतीत मंत्रालय पातळीवर बैठक लवकरच घेण्यात येणार आहे.
त्याचबरोबर कृष्णा खोरे पातळीवर कार्यकारी संचालक यांच्याबरोबर सुद्धा या बाबतीत बोलणे झाले असून त्यांनीही फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात बैठकीची तारीख दिली आहे.
याशिवाय प्रकल्पग्रस्तांना वाटप करण्यात आलेल्या जमिनींना प्राधान्याने सिंचनाची सोय उपलब्ध करण्यासाठी क्षेत्रीय पातळीवर काम चालू असून त्यांचे गट नंबर व क्षेत्र एकत्र करून मागणी शासनाकडे पाठवल्या आहेत. तारळी धरणाच्या लाभक्षेत्रात पाणी देण्यासाठी ज्या लिफ्ट योजना केल्या आहेत, त्याच्यावर दोन पाणी वापर संस्था केल्या असून उर्वरित पाणी वापर संस्था करण्याचे काम वेगाने सुरू आहे.
यावेळी बैठकीस शरद जांभळे, संतोष गोटल, आनंदा सपकाळ, प्रकाश भातुसे, रमेश शिंदे, वसंत निकम, विलास ताटे, देवानंद कदम, प्रकाश सोरटे, संजय पवार संदीप जांभळे व प्रकल्पग्रस्त कार्यकर्ते उपस्थित होते.