
सातारा प्रतिनिधी
बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे राज्यातील कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अशातच साताऱ्यामध्ये गोळीबाराची घटना समोर आली आहे. दुचाकीवरून आलेल्या तरुणांनी दोन जणांवर बेछुट गोळीबार केला.
गोळीबारात दोन्ही तरुण जखमी झाले आहे. थोडक्यात दोघेही बचावले आहे. त्यांना तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सातारा शहरालगत असलेल्या कोंडवे गावच्या हद्दीत पेट्रोल पंपालगत ही घटना घडली. जुन्या वादातून गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमध्ये दोघेजण जखमी झाले आहेत. अमर पवार आणि श्रेयस भोसले अशी जखमी झालेल्या युवकांची नावं आहेत. हे युवक मोळाचा ओढा आणि तामजाई नगर परिसरातील राहणारे आहेत.
आज दुपारी अमर पवार आणि श्रेयस भोसले हे दोघेही पेट्रोल पंपाच्या परिसरात कामानिमित्ताने आले होते. त्यांच्या मागावर असलेल्या दोन तरुण भरधाव दुचाकीवर आले आणि दोघांवर बेछुट गोळीबार सुरू केला. या गोळीबारात अमर पवार आणि श्रेयस भोसले दोघेही जखमी झाले. दोघेही रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर कोसळले. त्यानंतर हल्लेखोर दुचाकीवरून पसार झाले. स्थानिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिला. घटनेची माहिती मिळताच
सातारा तालुका पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जखमी तरुणांना सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार करण्यासाठी हलविले आहे. गोळीबार करणारे युवक दुचाकीवरून घटनास्थळावरून पसार झाले आहेत. पोलीस या घटनेचा सखोल तपास करत आहे. शहरात नाकाबंदी करण्यात आली आहे. हल्लेखोरांचा शोध घेतला जात आहे.