
सातारा प्रतिनिधी न्युज नेटवर्क
मंत्री शिवेंद्रराजे भोसलेंची घोषणा,सामाजिक तेढ रोखण्यात सातारच्या पत्रकारितेचे योगदान
सातारा: सातार्यातील पत्रकारितेला आदर्श परंपरा आहे. जिल्ह्याच्या विकासाच्या वाटचालीत योगदान देणारी सातारची पत्रकारिता असून पुणे विभागीय अधिस्विकृती समितीचे अध्यक्ष, सातारा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिष पाटणे व सातारा पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनी ज्या पत्रकारांना घरे नाहीत अशा गरजू व आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या पत्रकारांसाठी म्हाडातून घरे देण्याची मागणी केली आहे. आपल्या पत्रकार बांधवांसाठी त्यांनी मांडलेल्या मागणीबाबत आपण म्हाडामधून गरजू पत्रकारांना घरे देवू, अशी घोषणाच राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. शिवेंद्रराजे भोसले यांनी केली. दरम्यान, जातीय तेढ वाढणार नाही व सामाजिक सलोखा राखण्यात सातारच्या पत्रकारितेचे योगदान आहे, असे गौरवोद्गार ना.शिवेंद्रराजे यांनी काढले.
सातारा जिल्हा पत्रकार भवनामध्ये 6 जानेवारी या पत्रकार दिनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पुणे विभागीय अधिस्विकृती समितीचे अध्यक्ष हरिष पाटणे होते. प्रमुख उपस्थितांमध्ये माजी अध्यक्ष विनोद कुलकर्णी, सातारा पालिकेचे मुख्याधिकारी अभिजीत बापट, प्रभारी उपसंचालक वर्षा पाटोळे, सातारा इलेक्ट्रॉनिक मीडियाचे अध्यक्ष ओंकार कदम, डिजिटल मीडियाचे कार्याध्यक्ष सनी शिंदे उपस्थित होते.
मंत्री शिवेंद्रराजे भोसले म्हणाले, सातारच्या पत्रकारितेला मोठा वारसा आहे. हरिष पाटणे व विनोद कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील सर्व पत्रकार बांधव एकजुटीने काम करत आहेत, ही बाब कौतुकास्पद आहे. सातारची पत्रकारिता दर्जा राखणारी असून जिल्ह्यात कोणताही सामाजिक तिढा निर्माण होणार्या गोष्टी पत्रकार कधीही टोकाला नेत नाहीत. सामाजिक शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पत्रकारांचे योगदान राहिलेले आहे. सातार्यात गरजू व गरीब पत्रकारांना गृहसंकुल उभे करण्याचा प्रकल्प हाती घेण्याची मागणी हरिष पाटणे व विनोद कुलकर्णी यांनी केली आहे.
त्यानुसार मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनी तातडीने जागेचा शोध घ्यावा. प्रकल्पाचा प्रस्ताव दोघांना विचारुन तयार करावा. आपण गरजू व गरीब पत्रकारांना म्हाडामार्फत घरे देण्यासाठी नक्की प्रयत्न करु. संघटनेने सुसज्ज असे सातारा जिल्हा पत्रकार भवन उभे केले आहे. या भवनात आवश्यक त्या बाबींची पूर्तता जिल्हा नियोजन समितीमार्फत केली जाईल. शिवाय सातारा नगरपालिका देखभालीचे काम पाहील, असेही ना.शिवेंद्रराजे यांनी सांगितले. सातारा पत्रकार संघाचे अध्यक्ष विठ्ठल हेंद्रे यांनीही पत्रकार संरक्षण कायद्याबाबत मांडलेली भावना तसेच पत्रकारांच्या अडचणींसह सर्व विषय मार्गी लावण्यात माझे सहकार्य राहील, असेही मंत्री शिवेंद्रराजे म्हणाले.