
सातारा प्रतिनिधी
जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे तब्बल एक हजार हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्राचे नुकसान झाल्याची माहिती जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिली. जिल्ह्यातील तेरा मंडळांमध्ये सर्वाधिक फटका बसला असून, ज्यांचे ३० टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले आहे, अशा शेतकऱ्यांना शासनाकडून मदत दिली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, खटाव तालुक्यात वाहून गेलेल्या एका व्यक्तीचा मृतदेह सापडला असून, त्याच्या कुटुंबीयांना चार लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत पाटील यांनी सांगितले की, म्हसवडसह काही भागांमध्ये घरांचे, सुमारे २३ दुकानांचे मोठे नुकसान झाले. काही ठिकाणी रस्ते बंद झाले होते; मात्र आता सर्व रस्ते वाहतुकीसाठी खुले करण्यात आले आहेत. अतिवृष्टी झालेल्या १३ मंडळांमध्ये पंचनाम्याचे काम सुरू असून, कृषी सहाय्यक, महसूल सहाय्यक आणि ग्रामपंचायत अधिकारी यासाठी पाठविण्यात आले आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, ३० टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना उत्पादन क्षमतेनुसार भरपाई दिली जाईल. तसेच सततच्या पावसामुळे होणाऱ्या नुकसानीसंदर्भात शासन पातळीवर निर्णय होणार असून, मंत्रिमंडळात याबाबत चर्चा केली जाईल.
ऑगस्ट महिन्यात झालेल्या पावसाचा उल्लेख करताना पाटील म्हणाले, १७ ते १९ ऑगस्टदरम्यान पश्चिम घाटात मुसळधार पाऊस झाला. नद्यांची पाणी वाहून नेण्याची क्षमता ओलांडली गेल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी नदीपात्रात सोडावे लागले. त्यामुळे काही ठिकाणी रस्ते बंद झाले. मात्र, नंतर पावसाचा जोर कमी झाल्याने मोठी आपत्ती टळली.
पूरग्रस्तांना मदतीचे आवाहन
अतिवृष्टी व पुरामुळे मोठ्या संख्येने नागरिकांना फटका बसला आहे. या आपत्तीग्रस्तांना मदत करण्यासाठी दानशूर व्यक्ती व संस्थांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस सढळ हाताने योगदान द्यावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी केले.