
मुंबई प्रतिनिधी
राज्यातील सर्व नागरी सेवा आता व्हॉट्सॲपच्या माध्यमातून नागरिकांना उपलब्ध करून देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत त्यांनी या सेवेबाबत आढावा घेतला.
सध्या ‘आपले सरकार’ या पोर्टलवरून 1001 पैकी 997 सेवा नागरिकांना उपलब्ध आहेत. गेल्या पंधरवड्यातच 236 नवीन सेवा या पोर्टलवर जोडल्या गेल्या आहेत. आता या सर्व सेवा व्हॉट्सॲपद्वारेही नागरिकांना मिळतील, अशी माहिती बैठकीत देण्यात आली.
फडणवीस म्हणाले, “प्रत्येक तालुक्यात 10 ते 12 गावांचा समूह तयार करून त्यांना स्थानिक गरजांनुसार सेवा पुरवल्या जातील. सेवा वेळेत मिळाव्यात यासाठी समर्पित पथकांची नेमणूक करण्यात येईल. सेवांची गुणवत्ता कायम राखण्यासाठी तृतीय-पक्ष संस्थांकडून नियमित पडताळणी केली जाईल. तसेच अर्ज प्रक्रियेसाठी लागणारी कागदपत्रे लक्षणीयरीत्या कमी केली जातील.”
यासाठी जिल्हा परिषद, महापालिका आणि विद्यापीठांचे डॅशबोर्ड एकसमान करण्याचे निर्देशही मुख्यमंत्री यांनी दिले. राज्यभरात एकसंध अनुभव नागरिकांना मिळावा, यासाठी ‘रिंग’ व ‘क्लस्टर’ प्रणाली राबवली जाणार आहे. तसेच सेवा वितरणासाठी डिश डिजिटल सेवा हबचा वापर होणार आहे.