मुंबई प्रतिनिधी
मुंबई | घाटकोपर पूर्वेकडील पंतनगर परिसरातील एका गृहनिर्माण सोसायटीमध्ये भटक्या कुत्र्यावरून दोन कुटुंबांत जोरदार वाद निर्माण झाला. एका मराठी कुटुंबाने आजारी अवस्थेतील भटक्या श्वानाला आपल्या घरी आणल्यामुळे त्यांच्यावर शेजारील गुजराती कुटुंबाकडून दादागिरी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ सध्या समाजमाध्यमांवर आणि वृत्तवाहिन्यांवर प्रसारित होत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना घाटकोपर पूर्व येथील पंतनगरमधील एका सोसायटीत घडली. मराठी कुटुंबीयांनी सहानुभूतीपोटी आजारी कुत्र्याला तात्पुरते घरात घेतले होते. मात्र, यावरून शेजारी राहणाऱ्या गुजराती कुटुंबाने आक्षेप घेत वाद घातला. वाद इतका वाढला की संबंधित कुटुंबाने मराठी कुटुंबाच्या घरात घुसून धमकीवजा वर्तन केले, असा आरोप आहे. हा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून, संबंधित फुटेज सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
दरम्यान, पंतनगर पोलिसांनी या प्रकरणी अदखलपात्र गुन्हा नोंदवला असून, “या वादाला भाषिक अथवा प्रांतवादाचा कोणताही संबंध नसल्याचे” तक्रारदारांनी स्पष्ट केले आहे.
ही घटना स्थानिक पातळीवर तणावाचे वातावरण निर्माण करणारी असली तरी पोलिसांकडून शांततेत मध्यस्थी करून दोन्ही कुटुंबांना समज देण्यात आली आहे.


