
मुंबई प्रतिनिधी
महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (ATS) सोशल मीडियावर पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणेच्या प्रतिनिधींशी संपर्क साधून भारताच्या सुरक्षेशी संबंधित गोपनीय व संवेदनशील माहिती शेअर केल्याप्रकरणी एका भारतीय तरुणाला अटक केली आहे.
सदर तरुणाने नोव्हेंबर २०२४ पासून मे २०२५ पर्यंत फेसबुकच्या माध्यमातून संबंधित PIO शी संवाद साधला होता. या संवादादरम्यान त्याने भारत सरकारच्या कामकाजा संदर्भातील महत्त्वाची माहिती आणि संवेदनशील घडामोडी शेअर केल्याचे उघड झाले आहे.
पथकाने चौकशीत उघड केले की, हा संवाद अत्यंत नियोजित पद्धतीने करण्यात आला होता आणि तरुणास त्यासाठी मार्गदर्शनही करण्यात आले होते. ही माहिती मिळाल्यानंतर ATS ने तात्काळ कारवाई करत संबंधित तरुणास ताब्यात घेतले.
या प्रकरणी त्याच्याविरुद्ध भारतीय दंड विधान कलम १२३ (१)(अ), ४३ (१) तसेच अधिकृत गुप्तता अधिनियम १९२३ अंतर्गत कलम ५ (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सध्या दहशतवादविरोधी पथक या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, या गुप्त माहितीच्या देवाणघेवाणीत सहभागी असलेल्या इतर व्यक्तींचाही शोध घेतला जात आहे.