
मुंबई प्रतिनिधी
मुंबई|पासपोर्ट सेवा केंद्र (PSK), लोअर परळ, मुंबई येथे कार्यरत कनिष्ठ पासपोर्ट सहाय्यक आणि एका खासगी एजंटला बनावट कागदपत्रांच्या आधारे पासपोर्ट मिळवून देण्यासाठी लाच घेतल्याच्या आरोपाखाली सीबीआयने अटक केली आहे.
सीबीआयने याप्रकरणी एक गुन्हा दाखल केला असून, २०२३-२४ दरम्यान संबंधित शासकीय कर्मचाऱ्याने एजंटसह अन्य खासगी व्यक्तींशी संगनमत करून फसवणूक केली असल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. या टोळीने बनावट आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक स्टेटमेंट्स आणि जन्म प्रमाणपत्रांचा वापर करून सात अनोळखी अर्जदारांच्या नावे पासपोर्ट मिळवून दिले होते.
तपासादरम्यान उघड झाले की, या अर्जांमध्ये नमूद करण्यात आलेले मोबाईल क्रमांक सध्या कार्यरत नाहीत आणि पोलिस सत्यापन अहवालही नकारात्मक आले आहेत. विशेष म्हणजे, ‘तत्काळ योजना’अंतर्गत पासपोर्ट मिळवले गेले होते, आणि त्या वेळी सत्यापन टाळण्यात आले होते.
अटक करण्यात आलेल्या व्यक्तींमध्ये अक्षय कुमार मीणा (कनिष्ठ पासपोर्ट सहाय्यक) आणि भावेश शांतिलाल शाह (खासगी एजंट) यांचा समावेश आहे. चौकशीदरम्यान त्यांनी सहकार्य न केल्यामुळे त्यांना अटक करण्यात आली असून, त्यांना मुंबईतील विशेष सीबीआय न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने दोघांना ५ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली असून, २ जून २०२५ पर्यंत त्यांची कोठडी राहणार आहे.
या प्रकरणाचा तपास सुरू आहे.