
मुंबई प्रतिनिधी
अँटॉपहिल येथील राजीव गांधी नगर, न्यू ट्रांजिट कॅम्प, अनाबिया मेडिकल स्टोअर जवळ राहणाऱ्या इस्माईल शेख (वय 27) या हाताने भरतकाम करणाऱ्या तरुणाचा खून त्याची पत्नी सुमैया (वय 25) हिने तिचा प्रियकर सकलैन ऊर्फ झप्पर (वय 30) याच्या मदतीने केला. अँटॉपहिल पोलिसांनी अवघ्या दोन तासांत दोघांनाही अटक केली.
आज सकाळी सुमारे ८:३० वाजता शेजाऱ्यांनी पहिल्या मजल्यावरील गॅलरीत रक्ताचे थेंब पडलेले पाहिले आणि तात्काळ पोलिसांना माहिती दिली. अँटॉपहिल पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता गॅलरीत इस्माईल शेखचा मृतदेह आढळून आला. त्यांच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार केल्याचे स्पष्ट झाले.
पोलिसांनी घरातील पत्नी सुमैयाची चौकशी केली. मात्र ती वारंवार विरोधाभासी माहिती देत होती. त्यामुळे संशय बळावल्याने पोलिसांनी तिला ताब्यात घेतले. मृतदेह शवविच्छेदनासाठी सायन रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.
पोलिसांच्या सखोल चौकशीनंतर सुमैयाने अखेर गुन्ह्याची कबुली दिली. तिने तिचा प्रियकर सकलैनसोबत मिळून पतीची हत्या केल्याचे मान्य केले. सकलैन हा झवेरी बाजारमधील सोन्याच्या दागिन्यांना पॉलिश करणाऱ्या वर्कशॉपमध्ये काम करतो आणि तोही अँटॉपहिल परिसरातीलच आहे.
पोलिसांनी लगेचच सकलैनचा शोध घेऊन दोन तासांत त्याला अटक केली. चौकशीत दोघांनीही गुन्हा कबूल केला असून, खून केल्यानंतर मृतदेह लपवण्याचा त्यांचा कट उघड झाला आहे. मात्र सकाळ उजाडल्यामुळे आणि घाबरून सकलैन पळून गेला होता.
अँटॉपहिल पोलिसांनी दोघांनाही अटक केली असून, खूनाचा गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.