मुंबई प्रतिनिधी
मुंबई: शिवडी येथील श्री शिवडी जैन संघाच्या बंद मंदिरात २२ एप्रिल ते २३ एप्रिल दरम्यान झालेल्या चोरीप्रकरणी आर. ए. के. मार्ग पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे तीन आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून सुमारे ७.१५ लाख रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम हस्तगत करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चोरट्यांनी मुळराज भवन इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर असलेल्या जैन मंदिराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला होता. तेथून देवतांच्या मूर्तीवरील सोन्याचा टिका, कपटी, चांदीचे मुकुट आणि दानपेटीतील रोख रक्कम असा एकूण अंदाजे १९० ग्रॅम सोनं आणि ७५० ग्रॅम चांदीचे दागिने चोरी करण्यात आले होते. याप्रकरणी विपिन छगनलाल लालन (वय ५७) यांनी फिर्याद दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
चोरी स्थळावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे वायर कापून नुकसान करण्यात आले होते, तसेच आरोपींनी तोंड झाकल्यामुळे त्यांचे स्पष्ट फोटो मिळाले नव्हते. मात्र, पोलिस तपास पथकाने ७० हून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपींची ओळख पटवली आणि ते गुजरातमधील बनासकंठा जिल्ह्यातील असल्याचे निष्पन्न केले.
यानंतर सलग तीन दिवस सापळा रचून पोलिसांनी २ मे रोजी सुनीलसिंह सुरजसिंह दाभी (२३), राहुलसिंह प्रवीणसिंह वाघेला (२०) आणि जिगरसिंह दिनेशसिंह वाघेला (१९) या तिघांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून चोरीस गेलेली बहुमोल मालमत्ता देखील हस्तगत करण्यात आली आहे.
ही यशस्वी कारवाई पोलीस आयुक्त देवेन भारती, सह आयुक्त सत्य नारायण, अपर पोलीस आयुक्त अनिल पारसकर, पोलीस उप आयुक्त आर. रागसुधा, सहाय्यक पोलीस आयुक्त योगेश गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तपास पथकात वपोनि संदीप रणदिवे, पोनि (गुन्हे) संदीप ऐदाळे, सपोनि महेश मोहिते, सपोनि गोविंद खैरे आणि इतर अधिकारी व कर्मचारी यांचा सहभाग होता.
या कारवाईबद्दल नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असून, पोलिसांच्या तांत्रिक कौशल्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.


