मुंबई प्रतिनिधी
सदरुद्दीन खान हे नवी मुंबईतील एक बांधकाम व्यावसायिक आहेत. बुधवारी, 9 एप्रिल रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास, ते त्यांच्या कारचालक इरफान अहमद फसीहुल्ला सिद्धीकीसोबत घराच्या दिशेने जात असताना, चेंबूरच्या डायमंड गार्डनजवळ बाईकवरून आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी त्यांच्यावर गोळीबार केला. या गोळीबारात सदरुद्दीन खान यांच्या जबड्याला गंभीर दुखापत झाली असून, त्यांच्यावर अपोलो रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या घटनेनंतर चेंबूर पोलिसांनी हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला. पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस निरीक्षक धनश्याम नायर आणि त्यांच्या पथकाने तपास सुरू केला. तपासादरम्यान मिरारोड येथील नया नगर परिसरातून फिरोज खान याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. चौकशीत समोर आले की सदरुद्दीन आणि फिरोज यांच्यात प्रॉपर्टी संबंधी वाद सुरु होते आणि या वादातूनच फिरोजने दोन शूटरना गोळीबार करण्याची सुपारी दिली होती.
गोळीबाराच्या वेळी फिरोज घटनास्थळी उपस्थित होता आणि नंतर तेथून फरार झाला. त्याच्या अटकेनंतर मुख्य शूटरचे नाव समोर आले आणि त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम राबवली. अखेर आज दुपारी अफसर खान या मुख्य शूटरला अटक करण्यात आली. त्यानेच सदरुद्दीन खान यांच्यावर गोळ्या झाडल्याचे उघड झाले आहे.
दोन्ही आरोपींना पुढील चौकशीसाठी चेंबूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून, येत्या शनिवारी, 12 एप्रिल रोजी त्यांना स्थानिक न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.


