
पुणे प्रतिनिधी
कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने पुणे ग्रामीण जिल्ह्यात ८ मार्च रोजी मध्यरात्री १२ वाजून ५ मिनिटांपासून ते २१ मार्च रात्री १२ वाजेपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत.
महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम ३७ (१) अन्वये अपर जिल्हादंडाधिकारी ज्योती कदम यांनी हे आदेश दिले आहेत.
कलम ३७ (३) अंतर्गत ५ पेक्षा अधिक लोक एकत्रित येणे, याशिवाय पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांच्या पूर्वपरवानगीशिवाय सभा किंवा मिरवणुकीचे आयोजन करण्यास मनाई करण्यात आली आहे. राज्याच्या सुरक्षिततेला धोका पोहोचेल, सभ्यता आणि नितिमत्तेला धोका पोहोचेल किंवा राज्य उलथवून लावण्यास चिथावणी देणारी आवेशपूर्ण आणि द्वेषपूर्ण भाषणे, अविर्भाव, कोणत्याही प्रकारचे जिन्नस तयार करून त्याद्वारे लोकांमध्ये त्याचा प्रसार करणे, कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात येईल अशी वर्तवणूक करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.
स्फोटक किंवा ज्वलनशील द्रव पदार्थ बाळगण्यास मनाई आहे. शस्त्रे, हत्यारे, दगड आदी सोबत नेणे तसेच भाले, तलवार, काठ्या, दंड, बंदूक किंवा शरीराला हानी पोहचवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या वस्तू सोबत बाळगण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. कोणत्याही व्यक्तीच्या चित्राचे प्रतिकात्मक प्रेताचे किंवा राजकीय पक्षाच्या नेत्यांचे फोटो प्रदर्शन किंवा ते जाळणे, मोठमोठ्याने अर्वाच्च भाषेत घोषणाबाजी देण्याबरोबरच वाद्ये वाजवण्यास मनाई करण्यात आली आहे.
महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम ३७ (१) अन्वये अपर जिल्हादंडाधिकाऱ्यांनी नमूद केल्यानुसार, या मनाई आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई होणार आहे. जे या आदेशाचे उल्लंघन करतील ते महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम १३५ नुसार शिक्षेस पात्र होतील. हा प्रतिबंधात्मक आदेश सरकारी सेवेतील कर्मचारी, तसेच वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे कर्तव्य बजावण्याकरिता शस्त्र बाळगणे गरजेचे आहे आणि त्याची परवानगी असलेल्या कर्मचाऱ्यांना लागू होणार नाही.