पुणे प्रतिनिधी
एसटीच्या पुणे विभागातील १४ आगाराअंतर्गत येणाऱ्या ४२ स्थानकांच्या सुरक्षा ऑडिटमध्ये सर्वच आगारांमध्ये त्रुटी आढळून आल्या आहेत. त्यामुळे या त्रुटी तात्काळ दुर करण्यासाठी आवश्यक उपाययोजनाबाबतचा अहवाल एसटीच्या मध्यवर्ती कार्यालयाकडे पाठविण्यात आला आहे.
त्यावरून नेहमीप्रमाणे एसटीला घटना घडल्यावर जाग आली असून, आता तरी वेळेत उपयायोजना करून एसटी स्थानके सुरक्षित व्हावीत एवढीच अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत.
सुरक्षा ऑडिटमध्ये सर्व स्थानकावर सुरक्षारक्षक, सीसीटीव्ही कॅमेरे, सुरक्षा भिंत आणि पुरेशी प्रकाश व्यवस्था नसणे या त्रुटी आढळून आल्या. स्वारगेट बस स्थानकामधील घटनेनंतर शहरासह राज्यातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आणि स्थानकातील सुरक्षा व्यवस्थेचे वाभाडे निघाले. त्या पार्श्वभूमीवर परिवहन मंत्र्यांनी सर्व बस स्थानाकांचे सुरक्षा ऑडिट करण्याचे आदेश दिले होते.
त्यानुसार पुणे विभागात १४ आगारांतर्गत येणाऱ्या ४२ बस स्थानकांचे सुरक्षा ऑडीटचे काम तात्काळ सुरू करण्यात आले. त्यासाठी पुणे विभागातील अधिकाऱ्यांची टीम मागील काही दिवसांपासून सर्व स्थानकात जाऊन पाहणी करत आहे. दरम्यान, आॅडीटचे काम पूर्ण झाले असून, अहवाल सादर करण्यात आल्याची माहिती पुणे विभाग नियंत्रण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.
चार मुद्यांवर झाले आॅडिट
सर्व बस स्थानकांचे सुरक्षा ऑडिट करताना प्रामुख्याचे चार प्रमुख मुद्द्यांवर लक्ष केंद्रीत करण्यात आले. त्यानुसार अधिकाऱ्यांच्या टीमने आगारात जाऊन कसून तपासणी केली. त्यावेळी जवळपास सर्वच बस स्थानकात पुरेशी प्रकार व्यवस्था नसल्याचे दिसून आले. काही स्थानकात सीसीटीव्ही कॅमेरे आहेत पण त्यातील काही बंद आहेत. तर काही कॅमेऱ्यांची क्लॅरिटी कमी दिसून आली. काही स्थानकात सीसीटीव्ही कॅमेरेच नाहीत. सुरक्षा रक्षक कागदावर दिसतात मात्र प्रत्यक्षात उपस्थित नाही. तर काही स्थानकावर सुरक्षारक्षक होते. मात्र, संख्या अपुरी असल्याचे दिसून आले. बस स्थानकाला सुरक्षा भिंत असणे आवश्यक आहे. मात्र, बहुतांश स्थानकांना सिमाभिंत नाही. आओ जाओ घर तुम्हारा अशी परिस्थिती आहे.
नाचक्की झल्यानंतरही जाग नाही
राज्यात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियान राबविण्यात आले त्यावेळी स्वच्छतेसह तेथील सुरक्षा, प्रकाश व्यवस्था, सीसीटीव्ही आणि प्रवाशांसाठी असलेल्या सोयी-सुविधा याचीही माहिती घेण्यात आली होती. त्यात पुणे विभागातील शिवाजीनगर, नारायणगाव आणि सासवड स्थानक वगळता एकही स्थानक स्पर्धेत टिकले नाही. स्वारगेट स्थानकाला तर सर्वात कमी गुण होते. असे असतानाही मागील दहा महिन्यात काहीच सुधारणा होत नाही. त्यावरून एसटीला विकासाचा किती आळस आहे, हे दिसून येते.


