
सातारा प्रतिनिधी
देशपातळीवर अग्रेसर असलेल्या सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि कोल्हापूर येथील बँक एम्प्लॉइज युनियन यांच्यामध्ये बँक सेवकांना सुधारित वेतनश्रेणी लागू करण्याचा करार बँकेच्या संचालक मंडळ सभेत करण्यात आला.
बँकेच्या चतुर्थ श्रेणीपासून प्रथम श्रेणीपर्यंतच्या सेवक व अधिकार्यांना भरघोस पगारवाढ देण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे.
हा करार दि. 1 एप्रिल 2024 ते दि. 31 मार्च 2029 या मुदतीसाठी करण्यात आला आहे. सुधारित वेतनश्रेणी दि. 1 एप्रिल 2024 पासून लागू होणार असून, बँकेवर वार्षिक 14.50 कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे. या करारावर बँकेचे अध्यक्ष व खासदार नितीन पाटील, उपाध्यक्ष अनिल देसाई, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे, बँक एम्प्लॉइज युनियनचे अध्यक्ष अतुल दिघे, जनरल सेक्रेटरी नारायण मिरजकर, सेक्रेटरी प्रकाश जाधव, सेवक प्रतिनिधी संग्रामसिंह जाधव, जितेंद्र चौधरी यांनी सह्या केल्या आहेत. यावेळी बँकेचे ज्येष्ठ संचालक व विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर, खासदार उदयनराजे भोसले, माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, प्रभाकर घार्गे, दत्तानाना ढमाळ, राजेंद्र राजपुरे, प्रदीप विधाते, सुनील खत्री, रामराव लेंभे, ज्ञानदेव रांजणे, सुरेश सावंत, लहुराज जाधव, सौ. कांचन साळुंखे, सौ. ऋतुजा पाटील, सरव्यवस्थापक राजीव गाढवे, राजेंद्र भिलारे उपस्थित होते.
खासदार नितीन पाटील म्हणाले, संचालक मंडळाची धोरणे बँकेचे सेवक प्रभावीरित्या राबवत आहेत. सेवकांनी नवीन संगणकीय प्रणालीचा जास्तीत जास्त वापर करून, सभासद व ग्राहकांना जलद सेवा द्यावी. रामराजे म्हणाले, कर्मचार्यांनी आपली कार्यक्षमता वाढवून, बँकेच्या नफ्यात उत्तरोत्तर वाढ करणे आवश्यक आहे. ग्राहकांना डिजिटल बँकिंग सुविधा देण्यासाठी नवीन फिनॅकल कोअर बँकिंग प्रणाली स्वीकारली आहे.
या सुविधा ग्राहकांपर्यंत पोहोचवून बँकेचा व्यवसाय वाढवण्यासाठी कर्मचार्यांनी प्रयत्नशील राहावे. डॉ. राजेंद्र सरकाळे म्हणाले, स्पर्धेच्या युगात बँकेच्या सेवकांनी ग्राहकांना तत्पर, आपुलकीची व नम्रतेची सेवा देणे महत्त्वाचे आहे. बँकेच्या कर्ज योजना प्रभावीरित्या राबवाव्यात. अतुल दिघे यांनी जिल्हा बँकेच्या सर्वोत्कृष्ट कामाची प्रशंसा केली. पगारवाढीबरोबरच बँकेच्या सेवकांना अतिरिक्त लाभ देण्यात येणार आहेत. कर्मचाऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.