
सातारा प्रतिनिधी
अजिंक्यतारा किल्ल्याच्या परिसरात दरोडे टाकण्याच्या तयारीत असणाऱ्या चार जणांना सातारा शहर पोलीस व स्थानिक गुन्हे शाखा यांनी सापळा रचून आरोपींना अटक केली.
त्यांच्याकडून दोन देशी बनावटीची पिस्टल, पाच जिवंत काडतुसे, चार रिकाम्या पुंगळ्या, दोन मोटरसायकल, दोन लोखंडी सुरे, मोबाईल हँडसेट असा ४ लाख ४१ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
संबंधित आरोपी सातारा शहरातील सोन्याचे दुकान फोडून सोने चोरणार होते, अशी माहिती समोर आली आहे. अनुश चिंतामणी पाटील (वय २१, राहणार २६७ गुरुवार पेठ), भास्कर मालुसरे (वय १९, राहणार गुरुवार पेठ शिर्के शाळेजवळ), आनंद शेखर जाधव उर्फ जर्मनी (वय २५, राहणार इचलकरंजी कोल्हापूर), अक्षय अशोक कुंडुगळे (वय २५, राहणार जवाहरनगर इचलकरंजी), क्षितिज विजय खंडाईत (राहणार गुरुवार पेठ) यांना अटक करण्यात आली आहे.
सातारा शहर पोलिसांना शाहूनगर परिसरात काही जण एका रिकाम्या मैदानामध्ये जमले असल्याची माहिती मिळाली होती. त्यांचा संशयास्पद वापर असल्याचे पोलिसांना समजले होते. सातारा शहर पोलिसांचे एक पथक तात्काळ तेथे रवाना झाले. संशयितांच्या हातामध्ये लोखंडी सुरे दिसल्याने स्थानिक गुन्हे शाखा व गुन्हे प्रकटीकरण यांचा अतिरिक्त फौजफाटा पाठवण्यात आला. या संपूर्ण घटनाक्रमाची माहिती पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी अतिरिक्त पोलिस अधीक्षक वैशाली कडूकर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक करून देवकर, सातारा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के उपस्थित होते. सहाय्यक पोलीस निरीक्षक शाम काळे, शिवाजी भोसले, दत्तात्रय दराडे, रोहित फारणे, पोलीस उपनिरीक्षक सुधीर मोरे, विश्वास शिंगाडे, परितोष दातीर, विजय कांबळे, संजय शिर्के, शरद बेबले, अजय जाधव, प्रवीण फडतरे, अविनाश चव्हाण, स्वप्निल कुंभार, अरुण पाटील, गणेश कापरे, ओंकार यादव, सचिन ससाणे विशाल पवार यांनी ही कारवाई केली.