
मुंबई प्रतिनिधी
फाईव्हस्टार हॉटेल सोडून काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष झोपले आश्रमात
राज्यात उतरती कळा लागलेल्या काँग्रेस पक्षाच्या आगामी निवडणुकीसाठी जोरदार हालचाली सुरु आहे. राज्यातील काँग्रेस पक्षाची नव्याने बांधणी करण्यासाठी प्रदेशाध्यक्षपदाची धुरा हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.
आज प्रत्यक्षरित्या सपकाळ जबाबदारी स्विकारणार आहेत. दरम्यान, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष फाईव्हस्टार हॉटेल सोडून गिरगावच्या आश्रमात रात्रभर जमिनीवर झोपले असल्याचे निर्दशनास आले. त्यामुळं राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चा रंगली आहे.
हर्षवर्धन सपकाळ हे मंगळवारी मुंबईतील बिर्ला मातोश्री सभागृहात होणाऱ्या सोहळ्यात प्रदेशाध्यक्षपदाचा पदभार स्वीकारणार आहेत. त्यासाठी हर्षवर्धन सपकाळ हे सोमवारी मुंबईत हजर झाले आहेत. पण त्यांनी राहण्यासाठी एखादं फाईव्हस्टार हॉटेल निवडण्याऐवजी गिरगाव येथील नाना चौकात असणाऱ्या सर्वोदय आश्रमात मुक्काम केला. रात्रभर ते जमिनीवर झोपले. त्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चा रंगली. दरम्यान, त्यांनी माध्यमांसोबत यासंदर्भात संवाद साधला.
आश्रमात राहण्यावर काय म्हणाले काँग्रेसचे नवं प्रदेशाध्यक्ष?
जेव्हा जेव्हा मी मुंबईत आलो आहे तेव्हा मी नेहमी सर्वोदय आश्रमात राहिलो आहे. मी जमिनीवरचा कार्यकर्ता असल्याने मला नेहमीच सर्वोदय आश्रम भावला आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळं काँग्रेस पक्षातील आगामी बदलांची नांदी ठरणार का? असा सवाल उपस्थित होत आहे.
हर्षवर्धन सपकाळ कोण आहेत?
हर्षवर्धन सपकाळ यांचा राजकीय प्रवास हा जिल्हा परिषद सदस्यपदापासून सुरु झाला आहे. . आज त्यांच्यावर काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
हर्षवर्धन सपकाळ हे काँग्रेसचे माजी आमदार आहेत. 2014 ते 2019 ते बुलढाण्याचे आमदार होते. 2019 मध्ये त्यांना पुन्हा तिकीट मिळालं होतं, पण त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. सपकाळ यांनी आमदारकीच्या काळात जलसंधारण व्यवस्थापनाचा प्रकल्प मतदारसंघात राबवला होता.
सध्या काँग्रेसच्या राजीव गांधी पंचायत राज संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. 1999 ते 2002 या काळात ते जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते. 14-15 वर्षे राहुल गांधी यांच्या कोअर टीममध्ये काम केले आहे. भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या संदर्भात अनेकदा त्यांना ऑफर देण्यात आली मात्र त्यांनी काँग्रेस सोडली नाही.