
पुणे प्रतिनिधी
मोटारसायकली वरुन जाताना मोबाईलवर बोलणार्यास पोलिसांनी अडविल्यावर वाहतूक पोलिसांच्या डोक्यात दगड मारणार्या वाहनचालकाला पोलिसांनी पकडून त्याची फुरसुंगी परिसरात धिंड काढली.
भेकराईनगर येथे सासवड रस्त्यावर गुरुवारी सायंकाळी ही घटना घडली होती. या घटनेत पोलीस हवालदार राजेश गणपत नाईक (वय ४७) हे गंभीर जखमी झाले होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पिंपरी येथील कार्यक्रमात पुण्यामध्ये क्राईम रेशो वाढतो आहे. आरोपींनी पोलिसांनी धिंड काढून गुन्हेगारांमध्ये दहशत निर्माण करण्याची गरज असल्याचे सांगितले होते.
वाहतूक पोलिसांला मारहाण करुन जखमी करणार्या बबलु मासाळ (वय २५, मुळ रा. धाराशिव) याला धाराशिव येथून अटक करुन त्याची भेकराईनगर परिसरात धिंड काढून पोलिसांनी मुख्यमंत्री यांचा शब्द पाळला.
भेकराईनगर परिसरात या आरोपीची धिंड काढून पोलिसांवर हात उचलल्यावर काय होते, हे फुरसुंगी पोलिसांनी दाखवून दिले. बबलु मासाळ हा चालक म्हणून काम करतो. तो पुण्यात आईसमवेत रहातो. ही घटना घडल्यानंतर त्याचे व्हिडिओ व्हायरल झाल्यावर तो आपल्या मुळ धाराशिव गावी पळून गेला होता.
पोलीस हवालदार राजेश नाईक हे गुरुवारी सायंकाळी भेकराईनगर चौकात वाहतूक नियमाचे कर्तव्यावर होते. सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास एक जण फोनवर बोलत दुचाकीवरुन जात होता. नाईक यांनी त्याला गाडी चालवताना फोनवर बोलू नकोस, असे सांगितले. याचा राग आल्याने त्याने नाईक यांना शिवीगाळ करुन वाद घातला. रस्त्याच्या बाजूला पडलेला दगड उचलून त्यांच्या डोक्यात घातला. त्यात नाईक हे गंभीर जखमी झाले होते. या घटनेनंतर आरोपी पसार झाला होता. पोलिसांनी त्याला धाराशिव येथून अटक केली.