पुणे प्रतिनिधी
पुणे : ग्रामपंचायतीला मिळालेला निधी, त्यातून मंजूर झालेली विकासकामे आणि प्रत्यक्ष झालेला खर्च याची माहिती आता ग्रामस्थांना मोबाईलवरूनच पाहता येणार आहे. ग्रामपंचायत कार्यालयात वारंवार जाऊन कागदपत्रे किंवा माहिती मागविण्याची गरज राहणार नसून, केंद्र शासनाच्या ‘ई-ग्रामस्वराज’ पोर्टल आणि मोबाईल ॲपच्या माध्यमातून ग्रामपंचायतीच्या कारभाराची माहिती ऑनलाइन उपलब्ध होणार आहे.
ग्रामपंचायतींमध्ये अधिक पारदर्शकता आणण्याच्या उद्देशाने ही प्रणाली उपलब्ध करून देण्यात आली आहे. ग्रामपंचायतीला कोणत्या माध्यमातून निधी मिळाला, तो कोणत्या विकासकामासाठी मंजूर करण्यात आला आणि त्यापैकी किती रक्कम खर्च झाली, याची माहिती नागरिकांना पाहता येते. तसेच गावातील सुरू असलेल्या विकासकामांची प्रगती आणि त्यांची सद्यःस्थितीही ऑनलाइन तपासता येते.
ग्रामपंचायतीला केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांसह वेगवेगळ्या स्तरांतून निधी मिळतो. हा निधी कोणत्या योजनेतून प्राप्त झाला आणि त्याचा वापर कोणत्या कामासाठी करण्यात आला, याचा मागोवा ई-ग्रामस्वराजच्या माध्यमातून घेता येतो. त्यामुळे गावाच्या विकासासाठी आलेल्या निधीचा वापर नेमका कुठे झाला, याची माहिती नागरिकांना मिळू शकते.
गावातील रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, नाली, पथदिवे यांसह विविध विकासकामांची माहितीही या प्रणालीवर उपलब्ध आहे. कोणते काम प्रस्तावित आहे, कोणते काम मंजूर झाले आहे आणि त्याची सध्याची स्थिती काय आहे, हे नागरिकांना ऑनलाइन पाहता येते. मंजूर निधी आणि कामाची प्रगती याची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध असल्याने विकासकामांचा आढावा घेणे सोपे होणार आहे.
ई-ग्रामस्वराजवरील माहिती पाहण्यासाठी ग्रामपंचायत सदस्य असणे किंवा विशेष परवानगी घेणे आवश्यक नाही. मोबाईल आणि इंटरनेटची सुविधा असलेला कोणताही नागरिक ही माहिती ऑनलाइन पाहू शकतो. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या कामकाजावर नागरिकांची देखरेख वाढण्यास मदत होण्याची शक्यता आहे.
ग्रामपंचायतीने वर्षभरासाठी कोणती विकासकामे नियोजित केली आहेत, कोणती कामे मंजूर झाली आहेत आणि वार्षिक विकास आराखड्यात कोणत्या कामांचा समावेश आहे, याची माहितीही या प्रणालीवर पाहता येते. त्यामुळे गावाच्या विकासाचे नियोजन कोणत्या पद्धतीने करण्यात आले आहे, याची माहिती ग्रामस्थांना मिळू शकते.
बारामती पंचायत समितीचे गटविकास अधिकारी किशोर माने यांनी सांगितले की, ग्रामपंचायतींकडे १५ व्या वित्त आयोगाचा निधी येतो. या निधीचा खर्च करताना पारदर्शकता असणे आवश्यक आहे. निधी कोणत्या बाबींवर खर्च झाला, याची माहिती नागरिकांना वेळेत मिळणे महत्त्वाचे आहे. या दृष्टीने ई-ग्रामस्वराज पोर्टल महत्त्वाचे असून, त्याद्वारे नागरिकांना माहिती उपलब्ध होऊन पारदर्शकता वाढण्यास मदत होईल.
ग्रामपंचायतीच्या कार्यालयात जाऊन माहिती मिळविण्याऐवजी आता मोबाईलवरूनच गावातील निधी, विकासकामे आणि खर्चाचा आढावा घेण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या आर्थिक व्यवहारांपासून विकासकामांच्या प्रगतीपर्यंतचा हिशोब नागरिकांना अधिक सहजपणे पाहता येणार आहे.


