पुणे प्रतिनिधी
पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षांशी संबंधित मागण्यांसाठी पुण्यात सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला आता एका तरुणाच्या रांगड्या, थेट आणि उपरोधिक भाषणांचीही जोड मिळाली आहे. विवेकानंद पाटील या तरुणाने आंदोलनाच्या व्यासपीठावरून केलेल्या भाषणांमुळे सोशल मीडियावर त्याची चर्चा रंगली असून, विद्यार्थ्यांच्या भावना आपल्या खास कोल्हापुरी ढंगात मांडणारा वक्ता म्हणून तो लक्ष वेधून घेत आहे.
आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर विविध राजकीय नेते आणि लोकप्रतिनिधींनी विद्यार्थ्यांची भेट घेतली. या वेळी विवेकानंद पाटील याने केलेल्या भाषणातील अनेक वक्तव्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधले. राजकीय घडामोडींवर उपरोधिक भाष्य करतानाच, स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना त्याने आक्रमकपणे वाचा फोडली.
‘मोडा मान माझी, मी वाकणार नाही…’
विवेकानंद पाटीलच्या भाषणातील खास शैली सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. ‘रात्रीच्या टेबलावरून महाराष्ट्राला प्रबोधनकारांच्या सावलीत आणायचं आहे… मोडा मान माझी, मी वाकणार नाही…’ अशा शब्दांत तो आपल्या भूमिका मांडताना दिसतो. भाषणात ग्रामीण बोली, कोल्हापुरी लकब आणि उपरोध यांचा वापर करत तो विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना राजकीय संदर्भ देतो.
‘आम्ही शेतकरी आणि गोरगरिबांची लेकरं आहोत. पन्नास-पन्नास लाख रुपये देऊन वशिल्याने नोकऱ्या विकत घेण्याची आमची कुवत कुठे?’ असा सवाल करत त्याने स्पर्धा परीक्षांच्या व्यवस्थेबाबत विद्यार्थ्यांमध्ये असलेली अस्वस्थता व्यक्त केली.
‘आमदार फुटले, खासदार फुटले… पण पेपर फुटला तेव्हा आभाळ फाटलं!’
राजकीय पक्षांमधील फूट आणि MPSC पेपरफुटीचा संदर्भ जोडताना विवेकानंद पाटील याने केलेले भाष्यही चर्चेत आले. ‘आमदार फुटले, खासदार फुटले, पक्ष फुटले; इतकं दुःख झालं नाही. पण आमचा MPSCचा पेपर फुटला तेव्हा आम्हाला वाटलं, जणू आभाळच फाटलं,’ अशा शब्दांत त्याने विद्यार्थ्यांच्या संतापाला वाचा फोडली.
याच भाषणात ‘आता बालवाडीचा पेपर फुटायची वेळ येऊ देऊ नका’ असा टोला लगावत त्याने परीक्षा व्यवस्थेवरही प्रश्न उपस्थित केला.
सुप्रिया सुळे यांच्यासमोरही राजकीय फटकेबाजी
खासदार सुप्रिया सुळे यांच्यासमोर बोलतानाही विवेकानंद पाटीलने राजकीय पक्षांतील फुटीचा संदर्भ घेतला. ‘तुमची राष्ट्रवादी फुटली, उद्धव ठाकरे यांची शिवसेना फुटली आणि आमचा MPSCचा पेपर फुटला; आता आपण समदुःखी आहोत,’ अशा उपरोधिक शैलीत त्याने भाष्य केले.
त्याच्या या वक्तव्यांवर उपस्थित विद्यार्थ्यांमध्ये प्रतिक्रिया उमटल्या. राजकीय नेत्यांसमोरही कोणताही आडपडदा न ठेवता विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडण्याची त्याची पद्धत सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे.
मग विवेकानंद पाटील नेमका कोण?
MPSC आंदोलनाच्या निमित्ताने चर्चेत आलेला विवेकानंद पाटील हा विद्यार्थीवर्गातील तरुण वक्ता म्हणून पुढे आला आहे. त्याची ओळख सध्या त्याच्या भाषणांमुळेच अधिक ठळक झाली आहे. कोल्हापुरी रांगडी भाषा, मिश्कील उपरोध, राजकीय संदर्भ आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवरील आक्रमक मांडणी ही त्याच्या वक्तृत्वाची वैशिष्ट्ये असल्याचे त्याच्या आंदोलनातील भाषणांतून दिसून येते.
MPSCसारख्या स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून सरकारी सेवेत जाण्याचे स्वप्न पाहणाऱ्या ग्रामीण आणि सर्वसामान्य कुटुंबांतील विद्यार्थ्यांचा आवाज आपण मांडत असल्याचा सूर त्याच्या भाषणातून वारंवार उमटतो. त्यामुळे आंदोलनाच्या गर्दीतून एका नव्या तरुण वक्त्याचे नाव पुढे आले असून, ‘विवेकानंद पाटील कोण?’ हा प्रश्न आता सोशल मीडियावरही चर्चिला जात आहे.


