मुंबई प्रतिनिधी
मुंबई : खार (पूर्व) येथील जवाहर नगर परिसरातील ननकू सिंह चाळ आणि के. पी. शर्मा चाळीत गेल्या तीन महिन्यांपासून अत्यंत कमी दाबाने आणि कमी वेळ पाणीपुरवठा होत असल्याची तक्रार रहिवाशांनी केली आहे. यामुळे दैनंदिन गरजांसाठी पाणी अपुरे पडत असून, नागरिकांना विकतचे पाणी घेण्याची वेळ आल्याने रहिवाशांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
या संदर्भात रहिवाशांनी पूर्व विभाग कार्यालयातील संबंधित सहाय्यक महापालिका आयुक्तांकडे लेखी निवेदन देत तातडीने समस्या सोडविण्याची मागणी केली आहे. ७ ऑगस्ट २०२६ रोजी दाखल करण्यात आलेल्या या निवेदनात जलजोडणी क्रमांक CCN HFEQ0408656 चा उल्लेख करण्यात आला आहे.
निवेदनानुसार, परिसरात सकाळी ५ ते १० या वेळेत पाणीपुरवठा होतो. मात्र, ननकू सिंह चाळ आणि के. पी. शर्मा चाळीत सुमारे ४५ रहिवासी असूनही सकाळी ५ ते ६ या केवळ एका तासाच्या कालावधीत अत्यंत कमी दाबाने पाणी येते आणि त्यानंतर पाणीपुरवठा बंद होतो, अशी तक्रार करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, याच परिसरातील शेजारील चाळीत सकाळी ५ ते १० या वेळेत पाणी उपलब्ध होत असल्याचा दावा रहिवाशांनी केला आहे.
“आम्ही नियमित पाणीबिल भरत असतानाही पाणी कमी येत असल्याने प्रचंड गैरसोय होत आहे. पाणी विकत घेण्यासाठी अतिरिक्त खर्च करावा लागत आहे,” असे रहिवाशांनी निवेदनात नमूद केले आहे.
गेल्या तीन महिन्यांपासून निर्माण झालेल्या या समस्येमुळे महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच अन्य रहिवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे मऱहापालिका प्रशासनाने या पाणीपुरवठ्याची तातडीने पाहणी करून कमी दाबाने होणारा पाणीपुरवठा सुरळीत करावा आणि रहिवाशांची समस्या कायमस्वरूपी सोडवावी, अशी मागणी करण्यात आली आहे.


