मुंबई प्रतिनिधी
आकाशात तब्बल ३४ हजार फूट उंचीवर असताना कॉकपिटमध्ये झालेल्या जीवघेण्या हल्ल्यानंतरही प्रसंगावधान राखत १८० प्रवाशांचे प्राण वाचवणाऱ्या भारतीय वैमानिक कॅप्टन स्मित मच्छार यांच्या शौर्याचे जगभरातून कौतुक होत आहे. त्यांच्या धाडसी कामगिरीची दखल घेत औषधनिर्माता कंपनी मॅनकाइंड फार्माने मच्छार आणि त्यांच्या कुटुंबीयांना १ कोटी रुपयांचे बक्षीस देण्याची घोषणा केली आहे.
Capt. Smit Machchhar put his crew and every passenger before himself. That is true leadership.
As a humble gesture of gratitude, Mankind Pharma is contributing ₹1 crore to him and his family.
You have made India proud. We salute you. 🇮🇳#CaptSmitMachchhar pic.twitter.com/75pdk5iZqn
— Mankind Pharma (@Pharma_Mankind) October 2, 2026
दुबईहून तेल अवीवकडे जाणाऱ्या ‘फ्लायदुबई’च्या विमानात ही धक्कादायक घटना घडली. विमान ३४ हजार फूट उंचीवर असताना कॉकपिटमध्ये वैमानिक आणि सह-वैमानिकामध्ये वाद झाला. त्यानंतर सह-वैमानिकाने कॅप्टन स्मित मच्छार यांच्यावर चाकूने हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्यात मच्छार गंभीर जखमी झाले. मात्र, गंभीर परिस्थितीतही त्यांनी विमानावरील नियंत्रण कायम ठेवत प्रवाशांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य दिले.
हल्ल्यानंतर विमानाची उंची अवघ्या काही वेळात ३४ हजार फुटांवरून सुमारे १७ हजार फुटांपर्यंत खाली आली. त्यामुळे विमानातील प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. मात्र, संकटाच्या या परिस्थितीत मच्छार यांनी दाखवलेल्या धैर्यामुळे विमान अखेर सुरक्षितपणे सौदी अरेबियात उतरवण्यात आले. या घटनेत विमानातील सुमारे १८० प्रवाशांचे प्राण वाचल्याचे सांगितले जात आहे.
‘प्रवाशांना स्वतःपेक्षा अधिक प्राधान्य दिले’
मॅनकाइंड फार्माने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर निवेदन जारी करत कॅप्टन स्मित मच्छार यांच्या धैर्याचे कौतुक केले. “भारतीय वैमानिक स्मित मच्छार यांनी स्वतःपेक्षा प्रवाशांना अधिक प्राधान्य दिले. हेच खरे नेतृत्व आहे,” असे कंपनीने म्हटले आहे.
मच्छार यांच्या शौर्यपूर्ण कामगिरीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कंपनीने त्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना १ कोटी रुपयांचे बक्षीस देण्याचा निर्णय घेतला आहे. मच्छार यांनी भारताची मान अभिमानाने उंचावली असून, त्यांच्या कार्याला सलाम असल्याचेही कंपनीने नमूद केले.
‘पैशांतून शौर्याची किंमत मोजता येणार नाही’
“तुम्ही वाचवलेल्या प्रवाशांचे प्राण आणि तुम्ही दिलेली प्रेरणा यांची तुलना पैशांशी होऊ शकत नाही. मात्र, केवळ शब्दांतून आभार न मानता कृतीतून कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मॅनकाइंडने तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला १ कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. हा आमच्या आदराचा आणि कौतुकाचा छोटासा भाग आहे,” असे कंपनीने म्हटले आहे.
कॉकपिटमध्ये घडलेल्या या थरारक घटनेचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, घटनेबाबत अधिक तपशील समोर येण्याची प्रतीक्षा आहे. मात्र, गंभीर जखमी अवस्थेतही प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य देत विमान सुरक्षितपणे उतरवण्याच्या कॅप्टन स्मित मच्छार यांच्या धैर्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.


