मुंबई प्रतिनिधी
मुंबई : धारावीचा पुनर्विकास प्रत्यक्षात कसा असेल, पुनर्वसित नागरिकांना कशा प्रकारची घरे मिळणार, उद्योगांसाठी कोणत्या सुविधा उपलब्ध होणार आणि भविष्यातील धारावीचे स्वरूप कसे बदलणार, याची झलक आता नागरिकांना प्रत्यक्ष अनुभवता येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘धारावी एक्सपिरियन्स सेंटर’चे उद्घाटन करण्यात आले.
या केंद्रात केवळ पुनर्विकास प्रकल्पाचे आराखडे दाखविले जाणार नाहीत, तर नागरिकांना त्यांच्या भविष्यातील घरापासून परिसर, रस्ते, सामाजिक सुविधा आणि उद्योगांसाठीच्या कार्यस्थळांपर्यंतचा प्रत्यक्ष अनुभव घेता येणार आहे. त्यामुळे पुनर्विकासाबाबतच्या अफवा, गैरसमज आणि अपूर्ण माहितीला आळा बसून नागरिकांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण होण्यास मदत होईल, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.
धारावी केवळ झोपडपट्टी नाही; मोठे आर्थिक इंजिन
‘धारावी एक्सपिरियन्स सेंटर’ची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्री म्हणाले की, धारावी ही केवळ झोपडपट्टी नसून मोठे आर्थिक इंजिन आहे. कुंभारवाड्यातील मातीभांडी उद्योग, चामड्याचा व्यवसाय, अन्नप्रक्रिया, प्लास्टिक पुनर्चक्रीकरण यासह विविध लघु-मध्यम उद्योगांनी येथे मोठी अर्थव्यवस्था उभी केली आहे.
पुनर्विकास करताना धारावीची ही आर्थिक ओळख जपण्यावर भर देण्यात आला असून, विद्यमान उद्योगांना अधिक चांगल्या आणि नियोजित कार्यस्थळांची सुविधा उपलब्ध करून देण्याचा विचार आराखड्यात करण्यात आल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
‘घर मिळणार कुठे?’ या प्रश्नाचे केंद्रात उत्तर
पुनर्विकासानंतर आपले काय होणार, आपले घर कसे असेल, परिसरात कोणत्या सुविधा असतील, रोजगाराचे काय होईल, असे अनेक प्रश्न धारावीकरांच्या मनात आहेत. या प्रश्नांची माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देण्याचे काम ‘धारावी एक्सपिरियन्स सेंटर’ करणार आहे.
घरे, रस्ते, खुली मैदाने, सामाजिक पायाभूत सुविधा, उद्योगांसाठीच्या जागा आणि रोजगाराच्या संधी यांची माहिती आधुनिक पद्धतीने नागरिकांना येथे पाहता येणार आहे.
डिजिटल तंत्रज्ञानातून ‘आजची धारावी’ ते ‘उद्याची धारावी’
आधुनिक दृश्य-श्राव्य आणि डिजिटल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून धारावीच्या वर्तमानापासून भविष्यातील नियोजित स्वरूपापर्यंतचा प्रवास या केंद्रात मांडण्यात आला आहे. त्यामुळे पुनर्विकासाच्या आराखड्याची माहिती केवळ कागदावरील नकाशातून नव्हे, तर प्रत्यक्ष अनुभवाच्या माध्यमातून समजून घेता येणार आहे.
सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक ओळख जपण्याचा दावा
धारावीचा पुनर्विकास करताना येथील सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक ओळख जपून सर्वंकष नागरी परिवर्तन करण्याचा प्रयत्न असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. धारावीतील नागरिक आणि उद्योजकांच्या गरजा लक्षात घेऊन नियोजन करण्यावर भर असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
‘धारावी का कल’ गीताचे लाँचिंग
या कार्यक्रमात प्रख्यात गायक शंकर महादेवन यांनी गायिलेल्या बदलत्या धारावीचे चित्र मांडणाऱ्या ‘धारावी का कल’ या विशेष गीताचे लाँचिंग करण्यात आले. तसेच ‘मेरे सपनों की धारावी’ या पुस्तकाचे प्रकाशनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.
नागरिकांसाठी माहितीचे खुले व्यासपीठ
पुनर्विकास प्रकल्पाची माहिती नागरिक, विविध हितधारक तसेच नागरी नियोजनाचा अभ्यास करणाऱ्यांना एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हे केंद्र महत्त्वाचे ठरणार आहे. धारावीची आजची ओळख आणि पुनर्विकासानंतरचे संभाव्य स्वरूप यामधील दुवा म्हणून ‘एक्सपिरियन्स सेंटर’कडे पाहिले जात आहे.


