मुंबई प्रतिनिधी
मुंबई : “हमारे वोट का हिसाब… हमें दे दो ज्ञानेश कसाब”, “ज्ञानेश कुमार, दो रिजाइन”, “ग्यानू बाबू, इट्स डन ब्रो”, “एक चाय, दोन खारी… ग्यानू अब तेरी बारी” अशा घोषणांनी शुक्रवारी शिवाजी पार्कचा परिसर दणाणून गेला. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी तसेच निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता असावी, या मागण्यांसाठी **कॉक्रोच जनता पार्टी (CJP)**च्या वतीने आंदोलन करण्यात आले.
रखरखत्या उन्हाची पर्वा न करता सकाळपासूनच मोठ्या संख्येने तरुण, ज्येष्ठ नागरिक आणि विविध सामाजिक घटकांतील नागरिक शिवाजी पार्कमध्ये दाखल झाले. हातात फलक घेत आणि विविध घोषणाबाजी करत आंदोलकांनी आपला आक्रोश व्यक्त केला. विशेष म्हणजे कामाठीपुरातील महिलांनीही आंदोलनात सहभाग घेतला.
कलाविश्वातील दिग्गजांची उपस्थिती
या आंदोलनाला ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह, अभिनेत्री शबाना आझमी आणि गायक विशाल ददलानी यांनी उपस्थिती लावली. त्यांच्या उपस्थितीमुळे आंदोलनाला विशेष लक्ष मिळाले. विविध सामाजिक आणि सार्वजनिक प्रश्नांवर भूमिका मांडणाऱ्या कलावंतांनी आंदोलनकर्त्यांशी संवाद साधला.
शिवसेनेचाही पाठिंबा
शिवसेनेचे आमदार महेश सावंत आंदोलनस्थळी उपस्थित होते. युवासेनाप्रमुख आमदार आदित्य ठाकरे प्रकृती अस्वास्थ्यामुळे आंदोलनाला प्रत्यक्ष उपस्थित राहू शकले नाहीत. मात्र, शिवसेनेचा CJPच्या आंदोलनाला पाठिंबा असल्याचे महेश सावंत यांनी सांगितले.
डॉक्टरांनी स्वखर्चाने केली वैद्यकीय मदत
उन्हाचा तडाखा लक्षात घेऊन आंदोलनस्थळी वैद्यकीय मदतीचीही व्यवस्था करण्यात आली होती. नवी मुंबईतील डॉ. नितीन दिघे आणि खोपोली येथील डॉ. पठाण यांनी स्वखर्चाने प्रथमोपचार साहित्य उपलब्ध करून दिले. दिवसभरात सुमारे ३५० ओआरएस पाऊचचे वाटप करण्यात आले. तसेच अंगदुखी, अशक्तपणा यांसारख्या किरकोळ त्रासांसाठी औषधांचीही व्यवस्था करण्यात आली.
दरम्यान, आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शिवाजी पार्क परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मतदार यादी, निवडणूक प्रक्रिया आणि निवडणूक आयोगाच्या भूमिकेबाबत उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांमुळे CJPचे हे आंदोलन चर्चेचा विषय ठरले आहे.


