ठाणे प्रतिनिधी
ठाण्यातील शिवसेनेचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्या प्रकरणाचा तपास करताना ठाणे गुन्हे शाखेच्या पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. हत्येच्या अवघ्या तिसऱ्याच दिवशी पोलिसांनी दोन संशयित शूटरना अटक केली आहे. निखिल यादव आणि नितेश पवार अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. दोघेही वाहने बदलून गोव्याच्या दिशेने पसार होण्याच्या प्रयत्नात असताना पोलिसांनी मुंबई-गोवा महामार्गावर अलिबागजवळ सापळा रचून त्यांना ताब्यात घेतले.
पूर्णेकर यांच्या हत्येनंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली होती. या प्रकरणात दोन संशयित महिलांना ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी करण्यात आली. या चौकशीतून पोलिसांना महत्त्वपूर्ण माहिती मिळाल्याचे समोर आले. त्याच माहितीच्या आधारे पोलिसांनी निखिल यादव आणि नितेश पवार यांचा माग काढला आणि त्यांना गोव्याला जाण्यापूर्वीच पकडले.
पोलिसांच्या कारवाईमुळे आरोपींचा गोव्याला पसार होण्याचा डाव उधळला गेला. वाहने बदलून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, अशी प्राथमिक माहिती तपासातून समोर आली आहे. मात्र, पोलिसांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे पाळत ठेवत दोन्ही आरोपींना महामार्गावरच गाठले.
दोन शूटर अटकेत; आरोपींची संख्या तीनवर
पूर्णेकर हत्या प्रकरणात यापूर्वी एका आरोपीला अटक करण्यात आली होती. आता निखिल यादव आणि नितेश पवार या दोघांना अटक झाल्याने या प्रकरणातील अटक आरोपींची संख्या तीनवर पोहोचली आहे. दोघेही हत्येत प्रत्यक्ष सहभागी असलेले शूटर असल्याचा पोलिसांचा प्राथमिक संशय असून, त्यांची सखोल चौकशी सुरू आहे.
या दोघांच्या चौकशीतून हत्या नेमकी कोणत्या कारणातून करण्यात आली, हत्येचा कट कुठे आणि कसा रचण्यात आला, तसेच या कटामध्ये आणखी कोणाचा सहभाग होता, याचा उलगडा होण्याची शक्यता आहे.
हत्या कुणाच्या सांगण्यावरून? सूत्रधाराचा शोध
प्रदीप पूर्णेकर यांची हत्या राजकीय वादातून झाली की व्यावसायिक अथवा अन्य कोणत्या कारणातून, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. विशेष म्हणजे, या हत्येमागे नेमका सूत्रधार कोण? शूटरना कुणी सुपारी दिली? हत्येचा कट आखताना आणखी कोण सहभागी होते? या प्रश्नांची उत्तरे आता अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींच्या चौकशीतून मिळण्याची शक्यता आहे.
दोन संशयित महिलांकडून मिळालेली माहिती आणि त्यानंतर पोलिसांनी केलेली कारवाई या तपासातील महत्त्वाची कडी ठरली आहे. त्यामुळे निखिल यादव आणि नितेश पवार यांच्या चौकशीतून पूर्णेकर हत्या प्रकरणाचे धागेदोरे कुठपर्यंत पोहोचतात आणि या कटामागील सूत्रधार कोण आहे, याकडे ठाणेकरांचे लक्ष लागले आहे.


