मुंबई प्रतिनिधी
राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय झाला असून, पुढील तीन दिवस महाराष्ट्रातील अनेक भागांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने आज आणि उद्या राज्यातील बहुतांश जिल्ह्यांना पावसाचा इशारा दिला आहे. आज उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भाग वगळता राज्याच्या बहुतांश भागात पावसाची शक्यता असून, बुधवारी मुंबई वगळता संपूर्ण महाराष्ट्रासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
कोकण-गोवा आणि मराठवाड्यातील काही भागांत विजांच्या कडकडाटासह वादळी वारे आणि मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. या काळात ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
दक्षिण मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता असून, काही भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडू शकतो. उत्तर मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावरही वादळी वाऱ्यांसह मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज आहे.
आज सातारा-कोल्हापूर घाटमाथ्याला ऑरेंज अलर्ट
आज सातारा घाटमाथा आणि कोल्हापूर घाटमाथा या भागांना अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
तर ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सोलापूर, अहिल्यानगर, नाशिक आणि जळगाव यांसह संपूर्ण मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश भागांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
बुधवारी राज्यभर पावसाचा जोर
बुधवारी, 29 जुलै रोजी मुंबई वगळता संपूर्ण महाराष्ट्राला यलो अलर्ट देण्यात आला आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग, पुणे व सातारा घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथा तसेच जळगाव आणि मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता आहे.
दरम्यान, विदर्भातील गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या तीन जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून, या भागांत अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे, तसेच शेतकऱ्यांनी हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन शेतीविषयक कामांचे नियोजन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
पुढील तीन दिवसांचा हवामान अंदाज
29 जुलै, बुधवार
ऑरेंज अलर्ट : गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली
यलो अलर्ट : मुंबई वगळता संपूर्ण महाराष्ट्र
30 जुलै, गुरुवार
ऑरेंज अलर्ट : जळगाव, चंद्रपूर, पुणे घाटमाथा, सातारा घाटमाथा
यलो अलर्ट : पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर घाटमाथा, पुणे जिल्हा, सातारा जिल्हा, अहिल्यानगर, नाशिक, धुळे, नंदुरबार, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, नांदेड, हिंगोली, बुलढाणा, अकोला, वाशीम, यवतमाळ, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली.
31 जुलै, शुक्रवार
ऑरेंज अलर्ट : रायगड, पुणे घाटमाथा
यलो अलर्ट : पालघर, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर घाटमाथा, सातारा घाटमाथा, अहिल्यानगर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, अकोला, अमरावती, वर्धा आणि यवतमाळ.
राज्यातील काही भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता असल्याने नदी-नाले, ओढे आणि सखल भागांमध्ये पाणी साचण्याची शक्यता आहे. नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा आणि स्थानिक प्रशासन तसेच हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.


