पुणे प्रतिनिधी
पुणे : आषाढी वारी सोहळ्यादरम्यान सासवड-जेजुरी मार्गावर सोमवारी सकाळी भीषण अपघात घडला. भरधाव ट्रकने सात महिला वारकऱ्यांना जोरदार धडक दिल्याने तीन महिलांचा जागीच मृत्यू झाला, तर चार महिला गंभीर जखमी झाल्या. बेलसर टोल नाक्यापासून जेजुरीच्या दिशेने सुमारे ५०० मीटर अंतरावर हॉटेल शिपदीप लॉजिंगसमोर ही दुर्घटना घडली. अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली.
मिळालेल्या माहितीनुसार, अपघाताच्या वेळी पालखी सोहळा बोरावके मळा परिसरात होता. पालखीपासून सुमारे १२ किलोमीटर पुढे ही दुर्घटना घडली. वारकरी आणि वाहनांची सुरक्षित हालचाल व्हावी यासाठी रस्ता डिव्हायडरद्वारे विभागण्यात आला होता. उजवी बाजू वाहनांसाठी, तर डावी बाजू पायी चालणाऱ्या वारकऱ्यांसाठी राखीव ठेवण्यात आली होती. मात्र, काही वारकरी वाहनांसाठी राखीव असलेल्या मार्गावरून चालत असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
नांदेड जिल्ह्यातील लोहा येथील रंगनाथ महाराज पोखरबिसीकर यांच्या दिंडीचा ट्रक जेजुरीच्या दिशेने जात होता. त्याचवेळी सांगली जिल्ह्यातील कसबे दिग्रज येथील दिंडीतील सात महिला वारकरी वाहनांच्या मार्गावरून पुढे जात होत्या. प्राथमिक चौकशीनुसार, ७० वर्षीय ट्रक चालकाने ताप आणि सर्दीवरील औषधे घेतली होती. दुसऱ्या वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात त्याने ट्रक अचानक डावीकडे वळविल्याने तो थेट महिला वारकऱ्यांच्या अंगावर गेला.
या भीषण अपघातात नंदा पवार (वय ६०, रा. कवलापूर, ता. मिरज), माधवी राजाराम सालगरे (वय ५५, रा. मालगाव, ता. मिरज) आणि राजश्री शंकर भोसले (वय ५५, रा. कसबे दिग्रज, ता. मिरज) यांचा जागीच मृत्यू झाला. तर चार जखमी महिलांना तातडीने जेजुरी येथील आयसीयू रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
घटनेची माहिती मिळताच जेजुरी पोलीस ठाण्याचे अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी शिलिमकर तसेच पुणे ग्रामीणचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तातडीने बचावकार्य सुरू करत वाहतूक सुरळीत केली. त्यानंतर पंचनामा करून पुढील तपासाला सुरुवात करण्यात आली.
दरम्यान, अपघातास कारणीभूत ठरलेल्या सर्व बाबींची सखोल चौकशी सुरू असून चालकाची वैद्यकीय स्थिती, वाहनाचा वेग तसेच इतर तांत्रिक बाबींचा तपास केला जात आहे. संबंधित चालकाविरोधात कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.
या दुर्घटनेनंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी जेजुरी ग्रामीण रुग्णालयात जाऊन जखमी वारकऱ्यांची भेट घेत त्यांच्या प्रकृतीची माहिती घेतली. त्यानंतर गंभीर जखमींवर उपचार सुरू असलेल्या जेजुरीतील खासगी रुग्णालयालाही त्यांनी भेट दिली.


