नागपूर प्रतिनिधी
राज्यातील रेल्वे फाटकांवरील अपघातांना आळा घालण्यासाठी आणि सुरक्षित, जलद दळणवळण व्यवस्था उभारण्यासाठी महाराष्ट्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. येत्या तीन वर्षांत राज्यभरात १४५ रेल्वे उड्डाणपुलांचे (आरओबी) बांधकाम पूर्ण करून ‘रेल्वे फाटकमुक्त महाराष्ट्र’ साकारण्याचा संकल्प असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी नागपुरात केली.
नागपुरातील वर्धमाननगर येथील चार पदरी रेल्वे उड्डाणपुलासह राज्यातील ४८४ कोटी रुपयांच्या नऊ महत्त्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचे लोकार्पण मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, रेल्वे फाटकांवरील अपघातांमुळे दरवर्षी हजारो नागरिकांचा जीव जातो. ही गंभीर बाब लक्षात घेऊन राज्यातील रेल्वे फाटकांची समस्या कायमस्वरूपी सोडविण्यासाठी सरकारने व्यापक आराखडा तयार केला आहे. राज्यातील महत्त्वाच्या रेल्वे मार्गांवर उड्डाणपूल आणि अंडरपास उभारण्यास प्राधान्य देण्यात येत असून, या कामांची अंमलबजावणी महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (महारेल) मार्फत करण्यात येणार आहे.
मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, महारेलच्या स्थापनेमुळे रेल्वे प्रकल्पांच्या उभारणीला गती मिळाली असून, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कमी खर्चात दर्जेदार कामे पूर्ण करण्याचा नवा आदर्श निर्माण झाला आहे. नागपूरसह मुंबईतील तांत्रिकदृष्ट्या अत्यंत गुंतागुंतीचे पूलही विक्रमी वेळेत पूर्ण करण्यात आले असून, महारेलच्या नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानाला पेटंटही प्राप्त झाले आहे.
नागपूरमध्ये सुरू असलेल्या विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांमुळे शहराच्या औद्योगिक, शैक्षणिक आणि आर्थिक विकासाला मोठी चालना मिळत असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले. भगवान संभनाथ चौक ते डिप्टी सिग्नल मार्गावरील रेल्वे उड्डाणपुलाला माजी महापौर बहरीनबाई सोनबोईर यांचे नाव देण्यात येणार असल्याची घोषणाही त्यांनी केली.
कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरातील पारडी परिसरात उड्डाणपुलासह आधुनिक भाजी मार्केट आणि स्पोर्ट्स क्लब उभारण्याची घोषणा केली. या प्रकल्पासाठी सुमारे १५० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून, त्यापैकी ४० कोटी रुपये राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून (NHAI) उपलब्ध करून दिले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. पूर्व नागपूरमध्ये शैक्षणिक सुविधा, कचऱ्यापासून सीएनजी निर्मिती प्रकल्प आणि इतर पायाभूत विकासकामांमुळे शहराचा चेहरामोहरा बदलत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
महारेलचे महाव्यवस्थापक राजेशकुमार जयस्वाल यांनी राज्यात सुरू असलेल्या प्रकल्पांची माहिती देताना अमरावती, सातारा, नाशिक, सांगली, नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यांतील तीन रेल्वे उड्डाणपूल, चार सबवे आणि एका रोड अंडरब्रिजसह विविध प्रकल्पांवर ४८४ कोटी रुपयांचा खर्च करण्यात आल्याचे सांगितले. यापैकी सात प्रकल्प रेल्वे मंत्रालय आणि महाराष्ट्र शासन यांच्या ५०:५० खर्च वाटपाच्या तत्त्वावर पूर्ण करण्यात आले आहेत.
कार्यक्रमास महसूलमंत्री तथा नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राज्यमंत्री आशिष जयस्वाल, आमदार कृष्णा खोपडे, चरणसिंग ठाकूर, महापौर निता ठाकरे तसेच विविध लोकप्रतिनिधी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


