
पुणे प्रतिनिधी
पुण्यात ऑनलाईन फसवणूक होत असल्याची प्रकरणं दिवसेंदिवस वाढत चालली आहेत. ओटीपीची मागणी करुन, बँक डिटेल्स मागून खात्यातले सर्व पैसे गायब करण्याचं काम या लुटारु टोळ्या करत असतात.
नागरिकांची फसवणुक करण्यासाठी नवनवीन प्रकार, युक्त्या आखल्या जातात. महाराष्ट्रातील पुणे शहरात दिवसाला सुमारे 2 कोटी रुपयांच्या सायबर चोरट्यांनी फसवणूक केल्याच्या तक्रारी येत आहेत. त्यामुळे नागरिकांनी आपली फसवणूक टाळण्यासाठी आपणच सावधगिरी बाळगली पाहिजे. असे आवाहन पुणे शहर सायबर पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक संदीप कदम यांनी केले आहे.
लोणी काळभोर (ता.हवेली) येथील समाजभूषण गणपतराव काळभोर महाविद्यालयात नवीन कायदेविषयक व सायबर गुन्हेसंदर्भात जनजागृती कार्यशाळेचे आयोजन आज शुक्रवारी (ता.31) सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास करण्यात आले होते. यावेळी बोलताना वरील आवाहन संदीप कदम यांनी केले आहे. यावेळी विधी तज्ज्ञ ॲड. आर. बि. खंदारे, कायदेशीर सल्लागार ॲड. पिंकी राजगुरू.
लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, महाविद्यालयाचे प्राचार्य अंबादास मंजुळकर, प्राचार्य सीताराम गवळी, डॉ. संभाजी निकम, पोलिस उपनिरीक्षक अनिल जाधव, पूजा माळी, अमोल घोडके, रत्नदीप बिराजदार, सर्जेराव बोबडे, गोपनीय विभागाचे प्रमुख पोलिस हवालदार रामदास मेमाणे, रवी आहेर, पोलिस पाटील प्रियंका भिसे, पोलिस पाटील मिलिंद कुंजीर, महिला दक्षता समितीच्या सदस्या, पोलिस कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.
पुढे बोलताना संदीप कदम म्हणाले की, या सायबर फ्रॉडच्या फसवणुकीमध्ये समाजातील प्रतिष्ठित नागरिकांचा समावेश आहे. यामध्ये वकील, डॉक्टर, व्यावसायिक, बँकेचे अधिकारी, शिक्षक व पोलिसांचाही समावेश आहे. त्यामुळे आपल्या बँकेची कोणालाही माहिती देऊ नये. कारण धोका तो वही देता है! जिसमे जादा विश्वास होता है! आजची मुले ही उद्याची सुज्ञ नागरिक असणार आहेत. त्यांच्या हाती देश चालवण्याची जबाबदारी असणार आहे. त्यामुळे या प्रकारच्या फ्रॉड पासून सावध राहण्याची सर्वांना गरज आहे.
दरम्यान, या कार्यक्रमाचे आयोजन लोणी काळभोर पोलीस ठाणे, समाजभूषण गणपतराव काळभोर महाविद्यालय व पृथ्वीराज कपूर मेमोरियल हायस्कुल व ज्युनिअर कॉलेज च्या वतीने करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोलिस अंमलदार मंगेश नानापुरे यांनी केले तर आभार पोलिस उपनिरीक्षक अमोल घोडके यांनी मानले.