मुंबई प्रतिनिधी
राज्यातील सत्तासमीकरणांबाबत सुरू असलेल्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आले असून, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील चार आमदारांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नुकतीच भेट घेतल्याची माहिती राजकीय वर्तुळात चर्चेत आहे. या भेटीदरम्यान संबंधित आमदारांनी आणखी १२ आमदार आपल्या संपर्कात असल्याचे सांगितल्याचा दावा केला जात असून, या घडामोडींमुळे ठाकरे गटातील संभाव्य पक्षांतराच्या चर्चांना नवे बळ मिळाले आहे. मात्र, या दाव्याला अद्याप कोणताही अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
माहितीनुसार, दोन ते तीन दिवसांपूर्वी ही भेट पार पडली. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सध्या विधानसभेत २० आमदार आहेत. पक्षफोडीच्या तरतुदीनुसार दोनतृतीयांश संख्याबळासाठी किमान १४ आमदारांची आवश्यकता असते. त्यामुळे संबंधित आमदारांनी आवश्यक संख्याबळ उभे करण्यासाठी आणखी काही कालावधीची आवश्यकता असल्याचेही सांगितल्याची चर्चा आहे.
राजकीय वर्तुळात सध्या ‘ऑपरेशन टायगर ३.०’ या नावाने ठाकरे गटातील आमदारांना शिंदे गटात आणण्याचे प्रयत्न सुरू असल्याची चर्चा रंगली आहे. पुढील दोन ते तीन महिन्यांत आवश्यक संख्याबळासह स्वतंत्र गट स्थापन करण्याच्या हालचाली सुरू असल्याचे बोलले जात आहे. तथापि, या दाव्यांबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
या सर्व घडामोडींमध्ये सर्वाधिक उत्सुकतेचा विषय म्हणजे उपमुख्यमंत्री शिंदे यांची भेट नेमक्या कोणत्या आमदारांनी घेतली, हा आहे. संबंधित आमदारांची नावे अद्याप समोर आलेली नसून, या संपूर्ण प्रक्रियेबाबत गोपनीयता पाळली जात असल्याचे सांगितले जात आहे.
यापूर्वी ठाकरे गटातील काही खासदार शिंदे गटात जाण्याच्या शक्यतेबाबत चर्चा झाली होती. त्यानंतर आता आमदारांबाबतही अशाच प्रकारच्या हालचाली सुरू असल्याच्या चर्चेमुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा अस्थिरतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या घडामोडी प्रत्यक्षात आकार घेतात की केवळ राजकीय चर्चांपुरत्याच मर्यादित राहतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, या पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे खासदार नरेश मस्के यांनीही सूचक प्रतिक्रिया दिली आहे. “जे काही घडणार आहे, ते लवकरच सर्वांसमोर येईल,” असे ते म्हणाले. ठाकरे गटातील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते पक्षाच्या काही निर्णयांबाबत नाराज असून, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत असल्याचा दावाही त्यांनी केला. कार्यकर्त्यांची कामे होत असल्यामुळे अनेक जण शिंदे गटाशी जोडले जात असल्याचेही मस्के यांनी म्हटले.
दरम्यान, या सर्व दाव्यांवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही. त्यामुळे राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला असला, तरी प्रत्यक्ष पक्षांतर होणार की या चर्चा केवळ राजकीय रणनीतीचा भाग आहेत, याचे उत्तर येत्या काही दिवसांत स्पष्ट होण्याची शक्यता आहे.


