मुंबई प्रतिनिधी
स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय ऐतिहासिक मालिका ‘मी सावित्रीबाई जोतीराव फुले’ लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार असली, तरी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले यांच्या कार्याची कथा थांबणार नसल्याचे संकेत अभिनेता व खासदार अमोल कोल्हे यांनी दिले आहेत. मालिकेचा शेवटचा भाग नुकताच चित्रित झाला असून, मालिका अचानक बंद होत असल्याने प्रेक्षकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. अशा परिस्थितीत अमोल कोल्हे यांनी केलेली सोशल मीडियावरील पोस्ट आणि व्हिडिओ सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.
१४ जूनला स्टार प्रवाहवरील प्रवास थांबेल… पण गोष्ट नाही!
१३ जूनपासून पुन्हा शूटिंगला सुरुवात होणार..
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले यांचा इतिहास अर्धवट राहणार नाही.
स्टार प्रवाहवरील मालिका संपली तरी गोष्ट सुरूच राहणार!
तुमच्या प्रेमासाठी आणि… pic.twitter.com/kktnnCWdkI
— Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) June 8, 2026
मालिकेच्या सेटवरून शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये अमोल कोल्हे यांनी भावनिक शब्दांत प्रेक्षकांशी संवाद साधला. त्यांनी स्पष्ट केले की, “स्टार प्रवाहवरील मालिका संपत असली तरी ही गोष्ट संपलेली नाही. नेमकं कोणत्या माध्यमातून पुढचा प्रवास होणार आहे, दुसरी वाहिनी असेल की इतर कोणतं व्यासपीठ, याबाबत सध्या काही सांगू शकत नाही. मात्र एक गोष्ट ठामपणे सांगू शकतो की, ही कथा पुढे सुरू राहणार आहे.”
यावेळी त्यांनी १३ जूनपासून पुन्हा चित्रिकरण सुरू होणार असल्याची माहितीही दिली. “१४ जूनला मालिका ऑफ एअर होईल, पण त्याआधीच १३ जूनपासून आम्ही पुन्हा शूटिंगला सुरुवात करणार आहोत. त्यामुळे प्रेक्षकांनी नाराज किंवा निराश होण्याचं कारण नाही. आज ज्या ठिकाणी ‘पॅकअप’चा कॉल झाला, त्याच ठिकाणी १३ जूनला पुन्हा ‘रोल’चा कॉल मिळेल,” असे ते म्हणाले.
अमोल कोल्हे यांनी व्हिडिओसोबत शेअर केलेल्या पोस्टमध्येही मालिकेच्या पुढील प्रवासाबाबत सूचक भाष्य केले आहे. “१४ जूनला स्टार प्रवाहवरील प्रवास थांबेल… पण गोष्ट नाही! १३ जूनपासून पुन्हा शूटिंगला सुरुवात होणार. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले यांचा इतिहास अर्धवट राहणार नाही. मालिकेवर प्रेम करणाऱ्या आणि सातत्याने पाठिंबा देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनःपूर्वक आभार,” असे त्यांनी लिहिले आहे.
अमोल कोल्हे यांच्या या घोषणेनंतर मालिकेचा पुढील प्रवास कोणत्या माध्यमातून होणार, याबाबत विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे. मालिका दुसऱ्या वाहिनीवर दाखल होणार की एखाद्या ओटीटी प्लॅटफॉर्मवरून प्रेक्षकांच्या भेटीला येणार, याबाबत अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही. मात्र कोल्हे यांच्या वक्तव्यामुळे मालिकेचे चाहते पुन्हा आशावादी झाले आहेत.
दरम्यान, यावर्षी जानेवारी महिन्यात सुरू झालेल्या ‘मी सावित्रीबाई जोतीराव फुले’ या मालिकेत अमोल कोल्हे यांनी महात्मा ज्योतिराव फुले यांची, तर अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर यांनी सावित्रीबाई फुले यांची भूमिका साकारली होती. समाजसुधारणेचा इतिहास आणि स्त्रीशिक्षणाच्या चळवळीचा प्रेरणादायी प्रवास मांडणाऱ्या या मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. तरीही अवघ्या सहा महिन्यांत मालिकेचा पडदा पडत असल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
मालिकेतील अभिनेत्री गार्गी फुले यांनीही सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर करत संपूर्ण टीमसोबतच्या प्रवासाच्या आठवणींना उजाळा दिला. त्यामुळे मालिकेच्या समाप्तीबरोबरच कलाकार आणि प्रेक्षक या दोघांसाठीही हा भावनिक क्षण ठरत आहे.
आता अमोल कोल्हे यांनी दिलेल्या संकेतांनंतर ‘मी सावित्रीबाई जोतीराव फुले’ या मालिकेची कथा नेमक्या कोणत्या नव्या रूपात आणि कोणत्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर येणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


