
सातारा:प्रतिनिधी
वाई: येथील किसन वीर महाविद्यालयामध्ये १९८५- ८६ या शैक्षणिक वर्षातील कला शाखेच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा नुकताच अतिशय उत्साहाच्या वातावरणात पार पडला.
जनता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. मदनदादा भोसले यांच्या मार्गदर्शन व कल्पनेतून झालेला महाविद्यालयाचा विकास व बदललेले रूप पाहून सर्व माजी विद्यार्थी अतिशय भारावून गेले. त्यांनी सर्व विभागांना आत्मीयतेने भेटी दिल्या, सर्व परिसर फिरून पाहिला आणि त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.
किसन वीर परिवारामध्ये पुन्हा आल्यामुळे आम्हास नवी ऊर्जा, प्रेरणा आणि नव्याने जीवन जगण्याची एक उमेद मिळाली अशी अनेकांनी आपली मनोगते व्यक्त केली. आपल्या महाविद्यालयाप्रती जिव्हाळ्याचे नाते किती नाजूक, पवित्र आणि अतूट असते हे अनेकांच्या पाणावलेल्या डोळ्यांमध्ये दिसले.
मेळाव्याची सुरुवात जनता शिक्षण संस्थेचे संस्थापक थोर स्वातंत्र्य सेनानी देशभक्त किसन वीर व तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, संस्थेचे माजी अध्यक्ष कै. प्रतापराव भोसले, माजी उपाध्यक्ष कै. लक्ष्मणराव जाधव-पाटील यांच्या आचार व विचारांना अभिवादन करून झाली. श्री. अविनाश चव्हाण यांनी माजी विद्यार्थ्यांच्यावतीने प्रभारी प्राचार्य, उपप्राचार्य व समन्वयक यांचा सन्मान केला. महाविद्यालयाच्यावतीने मेळाव्याचे प्रास्ताविक आणि स्वागत माजी विद्यार्थी समितीचे समन्वयक व आयक्यूएसीचे सह-समन्वयक डॉ. बाळकृष्ण मागाडे यांनी केले. प्रभारी प्राचार्य डॉ. विनोद वीर यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतामध्ये महाविद्यालयाच्या विकासाची वाटचाल कथित केली व महाविद्यालयास वारंवार भेट देण्याचे सर्वांना आवाहन केले. सर्वांनी यास उस्फूर्तपणे होकार दिला.
उपप्राचार्य डॉ. हणमंतराव कणसे यांनी उपस्थितांचे आभार मानले. उपप्राचार्य भीमराव पटकुरे प्रा सुमित कोरडे व अमोल कवडे यांची उपस्थिती होती. यावेळी माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा मेळावा यशस्वी करण्यासाठी श्री. अनिल शेलार श्री. पुरुषोत्तम यादव व श्री. ऋषिकेश शिंदे यांनी अथक परिश्रम घेतले.