मुंबई प्रतिनिधी
महापालिका निवडणुकीच्या धावपळीचा परिणाम उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रकृतीवर झाला असून, त्यांची तब्येत अस्वस्थ असल्याची माहिती सूत्रांनी दिली. डॉक्टरांनी पूर्ण विश्रांतीचा सल्ला दिल्यामुळे शिंदे यांनी शनिवारी दिवसभरातील सर्व नियोजित कार्यक्रम राखीव ठेवले आहेत.
प्रकृतीच्या कारणास्तव शिंदे हे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीलाही अनुपस्थित होते. याबाबत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आधीच कल्पना दिली असल्याचे समजते. गेल्या महिनाभरात महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी मुंबईसह राज्यातील विविध शहरांत त्यांनी सातत्याने सभा घेतल्या होत्या. या सततच्या प्रवासामुळे आणि धावपळीमुळे त्यांची प्रकृती बिघडल्याचे सांगण्यात येते.
दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार हेही मंत्रिमंडळाच्या बैठकीला गैरहजर होते. बारामती येथे कृषी प्रदर्शनाचा कार्यक्रम असल्यामुळे ते बैठकीस उपस्थित राहू शकले नसल्याची माहिती आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिंदे यांच्या शिवसेनेने ९० जागांवर उमेदवार दिले होते. त्यापैकी २९ जागांवर पक्षाला यश मिळाले. निकालानंतर नवनिर्वाचित सर्व नगरसेवकांना एका पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवण्याचा विशेष आराखडा करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. सत्तास्थापनेपर्यंत नगरसेवकांना हॉटेलमध्येच मुक्कामी ठेवले जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
दरम्यान, ठाण्यात अधिक जागा लढवल्या असत्या, तर आणखी नगरसेवक निवडून आले असते, असे मत भाजप आमदार संजय केळकर यांनी व्यक्त केले. ठाण्यात भाजपने ३९ जागांवर निवडणूक लढवून २८ जागांवर विजय मिळवला असून, भाजपचा ‘स्ट्राईक रेट’ सर्वाधिक असल्याचे भाजप नेते निरंजन डावखरे यांनी नमूद केले.


