मुंबई प्रतिनिधी
मुंबईकरांची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर काही तरुणांनी बेदरकारपणे दुचाकी चालवत स्टंटबाजी केल्याचा प्रकार उघडकीस आला असून, याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या प्रकारामुळे स्वतःचा तसेच इतर वाहनचालकांचा जीव धोक्यात घालण्यात आल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
@MTPHereToHelp Early morning menance on Western Express Highway near nesco going towards bandra pic.twitter.com/OEsE8SL3i3
— Anand Chila (@AnandChila4) January 17, 2026
गोरेगाव येथील नेस्को परिसरालगत वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर पहाटेच्या सुमारास हा प्रकार घडला. सोशल मीडियावर १७ जानेवारी रोजी सकाळी ६.११ वाजता एक्स (पूर्वीचे ट्विटर) या मंचावर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या फुटेजमध्ये सुमारे दहा दुचाकीस्वार वेगाने, हेल्मेटशिवाय आणि वाहतूक नियमांचे सर्रास उल्लंघन करत मार्गक्रमण करत असल्याचे स्पष्ट दिसते. प्रत्येक दुचाकीवर मागे एक प्रवासी असून काही वाहनांवर सुधारित सायलेन्सर असल्याचा संशयही व्यक्त करण्यात येत आहे.
आनंद चिला या वापरकर्त्याने हा व्हिडिओ शेअर करत ‘वांद्रेकडे जाणाऱ्या नेस्कोजवळील वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर पहाटेचा धोका’ असे कॅप्शन दिले आहे. काही वेळातच हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला असून अनेक नागरिकांनी या प्रकारावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
जवळून जाणाऱ्या एका कारमधून हे दृश्य चित्रित करण्यात आले असून, दुचाकीस्वार इतर वाहनांचा मार्ग अडवत असल्याचेही या व्हिडिओत दिसून येते. पहाटेच्या वेळेत वाहतूक तुलनेने कमी असली तरी अशा बेदरकार वाहनचालना गंभीर अपघातांना निमंत्रण देऊ शकतात, असा इशारा नागरिकांकडून देण्यात येत आहे.
दरम्यान, या प्रकरणाची दखल घेत मुंबई वाहतूक पोलिसांनी संबंधित पोस्टवर उत्तर देत आवश्यक कारवाईसाठी वांद्रे वाहतूक विभागाला माहिती देण्यात आल्याचे सांगितले आहे. मात्र, या घटनेतील दुचाकीस्वारांविरोधात नेमकी कोणती कारवाई करण्यात आली, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही.
वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत असून, अशा घटनांवर वेळीच लगाम घातल्यास भविष्यातील अपघात टाळता येतील, असे मत व्यक्त केले जात आहे.


