मुंबई प्रतिनिधी
मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या निकालांनी शहरातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली आहेत. ऐतिहासिक यश मिळवत भारतीय जनता पक्षाने देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिकेवर सत्ता मिळवली असून, आता सर्वांचे लक्ष मुंबईच्या पुढील महापौरपदाकडे लागले आहे.
निवडणूक प्रचारादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी “मुंबईचा पुढचा महापौर हिंदू आणि मराठी असेल,” असे केलेले विधान आता निर्णायक ठरताना दिसत आहे. भाजप सर्वात मोठा पक्ष ठरल्यानंतर या निकषांमध्ये बसणाऱ्या उमेदवारांबाबत पक्षांतर्गत चर्चा तीव्र झाल्या आहेत. महापौरपदासाठी पाच नावे सध्या आघाडीवर असल्याचे बोलले जात आहे.
• तेजस्वी घोसाळकर
दहिसरमधील प्रभाग क्रमांक २ मधून दहा हजारांहून अधिक मतांनी विजयी झालेल्या तेजस्वी घोसाळकर यांचे नाव सर्वाधिक चर्चेत आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते विनोद घोसाळकर यांच्या त्या सून आहेत. पती अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येनंतर त्या सार्वजनिक जीवनात अधिक सक्रिय झाल्या. निवडणुकीपूर्वी ठाकरे गटातून बाहेर पडत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. तरुण, सुशिक्षित आणि “मराठी-हिंदू” या सूत्रात बसणारा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे.
• प्रकाश दरेकर
प्रभाग क्रमांक ३ मधून मोठा विजय मिळवलेले प्रकाश दरेकर हे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचे बंधू आहेत. वायव्य मुंबईत दरेकर कुटुंबाची मजबूत पकड असून, मराठी मतदारांमध्ये त्यांचा प्रभाव मानला जातो. प्रशासकीय अनुभवामुळे ते महापौरपदाचे सक्षम दावेदार ठरतात.
• प्रभाकर शिंदे
भाजप गटाचे माजी नेते प्रभाकर शिंदे हे महापालिकेतील सर्वात अनुभवी नगरसेवकांपैकी एक आहेत. पालिकेच्या कामकाजाची सखोल माहिती आणि नियमांची जाण, तसेच मराठी चेहरा ही त्यांची जमेची बाजू आहे. त्यामुळे ‘सुरक्षित पर्याय’ म्हणून त्यांचे नाव घेतले जात आहे.
• मकरंद नार्वेकर
दक्षिण मुंबईतील प्रभावी नेते मकरंद नार्वेकर हे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे बंधू आहेत. कुलाबा परिसरात त्यांची मजबूत पकड असून ते सातत्याने निवडून येत आहेत. मराठी समाजातून आले असले तरी आधुनिक आणि पुरोगामी प्रतिमेमुळे भाजप त्यांच्याकडे एक व्यापक चेहरा म्हणून पाहत आहे.
• राजश्री शिरवाडकर
प्रभाग क्रमांक १७२ मधून विजयी झालेल्या राजश्री शिरवाडकर या भाजपच्या आक्रमक आणि निष्ठावंत मराठी महिला नेत्यांपैकी एक आहेत. महिला आरक्षणाचा विचार झाल्यास त्यांचे नाव आघाडीवर राहू शकते. स्थानिक प्रश्नांवर त्यांची सक्रियता लक्षवेधी मानली जाते.
भाजपचा पुढील महापौर कोण असेल, याचा अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठी आणि नेतृत्वाकडून घेतला जाणार आहे. मात्र, मुंबईच्या राजकारणात नव्या पर्वाची सुरुवात होत असल्याचे चित्र सध्या स्पष्ट दिसत आहे.


