मुंबई प्रतिनिधी
मुंबई महानगरपालिकेच्या २२७ जागांसाठी झालेल्या चुरशीच्या निवडणुकीचा निकाल अखेर जाहीर झाला असून, या निकालाने मुंबईच्या राजकारणात महत्त्वाचा बदल अधोरेखित केला आहे. तब्बल अडीच दशकांहून अधिक काळ मुंबईवर वर्चस्व राखणाऱ्या ठाकरे गटाच्या सत्तेला धक्का देत भारतीय जनता पक्षाने (भाजप) सर्वाधिक जागा जिंकून महापालिकेतील सर्वात मोठा पक्ष होण्याचा मान मिळवला आहे. विकास, पायाभूत सुविधा आणि सुशासन या मुद्द्यांवर भर देत भाजपने मुंबईच्या विविध भागांत आपली पकड मजबूत केली आहे.
भाजपची मुसंडी, ८९ जागांवर विजय
या निवडणुकीत भाजपने ८९ जागांवर विजय मिळवत स्पष्ट आघाडी घेतली. कोस्टल रोड, मेट्रो प्रकल्प, रस्ते आणि नागरी सुविधा या विकासकामांचा प्रचारात ठळक उल्लेख करत भाजपने शहरी मतदारांचा विश्वास संपादन केल्याचे निकालातून स्पष्ट होते. मराठीबहुल भागांतही भाजपने अपेक्षेपेक्षा अधिक जागा जिंकत आपली ताकद दाखवून दिली.
ठाकरे गट दुसऱ्या क्रमांकावर
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाने ६५ जागा जिंकून दुसरा क्रमांक मिळवला. भावनिक मुद्दे आणि ‘मराठी अस्मिता’वर भर देत प्रचार करण्यात आला असला, तरी सत्ता कायम राखण्यात ठाकरे गटाला अपयश आले. शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाने २९ जागा जिंकत महायुतीला निर्णायक बहुमतात महत्त्वाची साथ दिली.
इतर पक्षांची कामगिरी
काँग्रेसला २४ जागांवर समाधान मानावे लागले, तर एमआयएमने ८ जागा जिंकत काही भागांत आपले अस्तित्व कायम ठेवले. मनसेला ६ जागा मिळाल्या असून, राष्ट्रवादी काँग्रेसला केवळ ३ जागांवर यश आले. समाजवादी पार्टीने २, तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाला १ जागा मिळाली.
पक्षनिहाय जागावाटप
– भाजप – ८९
– शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) – ६५
– शिवसेना (एकनाथ शिंदे) – २९
– काँग्रेस – २४
– एमआयएम – ८
– मनसे – ६
– राष्ट्रवादी काँग्रेस – ३
– समाजवादी पार्टी – २
– राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) – १
– एकूण – २२७
मतदानाची आकडेवारी
या निवडणुकीत एकूण ५४ लाख ६४ हजार ४१२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. एकूण मतदानाची टक्केवारी ४७.७२ इतकी नोंदवण्यात आली. विजयी उमेदवारांना मिळालेल्या मतांपैकी भाजपच्या उमेदवारांना एकूण ११ लाख ७९ हजार २७३ मते मिळाली असून, ही मते विजयी उमेदवारांच्या एकूण मतांच्या सुमारे ४५.२२ टक्के आहेत.
महायुतीचा ‘मॅजिक फिगर’ पार
भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने महायुती म्हणून निवडणूक लढवली होती. या दोन्ही पक्षांनी मिळून ११४ या बहुमताच्या आकड्यापेक्षा अधिक, म्हणजे ११५ हून जास्त जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे आगामी महापौरपदावर महायुतीचाच उमेदवार विराजमान होणार, हे जवळपास निश्चित झाले आहे.
विकासाच्या अजेंड्याला कौल
निवडणूक निकालातून मुंबईकरांनी भावनिक आवाहनांपेक्षा विकासकामे, पायाभूत सुविधा आणि प्रशासनातील स्थैर्य यांना प्राधान्य दिल्याचे चित्र स्पष्ट होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील विकासाच्या दृष्टीकोनाला मुंबईकरांनी कौल दिला असल्याचे या निकालातून अधोरेखित झाले आहे.
ठाकरे बंधूंच्या समीकरणावर प्रश्नचिन्ह
तब्बल दोन दशकांनंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणे एकत्र येत प्रचार केला होता. मात्र, मनसेला मर्यादित यश मिळाले, तर उद्धव ठाकरे गट सत्तेपासून दूर राहिला. त्यामुळे भविष्यातील राजकीय समीकरणे आणि विरोधकांची रणनीती कशी असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मुंबई महापालिकेच्या या निकालाने राज्याच्या राजकारणाला नवी दिशा दिली असून, आगामी काळात मुंबईतील प्रशासन आणि विकासकामांचा वेग कसा राहतो, यावर सर्वांचे लक्ष केंद्रित होणार आहे.


