मुंबई प्रतिनिधी
मुंबईसारख्या महानगरात लोकल रेल्वे ही केवळ वाहतुकीची सोय नसून शहराच्या जीवनवाहिनीप्रमाणे आहे. मात्र सध्या पश्चिम रेल्वेवरील दीर्घकालीन ब्लॉकमुळे हीच जीवनवाहिनी प्रवाशांसाठी धोक्याचा इशारा ठरत असल्याचे चित्र समोर येत आहे. अंधेरी रेल्वे स्थानकावरील गर्दीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून, प्रवाशांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
Daily scene at Andheri station 🫠 due to block , western railway aap log itna bekar management kar sakte ho ? You are best in india , last minute platform change why? @WesternRly where is rpf ? Public running on track, waiting for mishap @husainlimdi2810 @Ayushman2251187 video:ig pic.twitter.com/MPqo4ROQ4h
— KUMAR SAKET/ साकेत (@Feb030223) January 6, 2026
कांदिवली ते बोरीवली दरम्यान सहाव्या मार्गाच्या कामासाठी डिसेंबर अखेरपासून तब्बल ३० दिवसांचा मोठा ब्लॉक घेण्यात आला आहे. हा ब्लॉक १८ जानेवारी २०२६ पर्यंत सुरू राहणार असून, या कालावधीत दररोज २०० ते ३५० लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. याचा थेट परिणाम अंधेरी, गोरेगाव आणि बोरीवलीसारख्या महत्त्वाच्या स्थानकांवर जाणवत आहे.
विशेषतः अंधेरी स्थानकावर संध्याकाळच्या गर्दीच्या वेळेत परिस्थिती अत्यंत बिकट होत असल्याचे व्हायरल व्हिडीओत स्पष्ट दिसते. प्लॅटफॉर्मवर अक्षरशः पाय ठेवायलाही जागा नसताना अचानक प्लॅटफॉर्म बदलाची घोषणा करण्यात येते. त्यानंतर घाबरलेले प्रवासी फूटओव्हर ब्रिजवरून धावताना, तर काहीजण थेट रेल्वे रूळ ओलांडत पळताना दिसतात. हा प्रकार अत्यंत धोकादायक असून, थोडीशी चूक मोठ्या अपघातास कारणीभूत ठरू शकते.
या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी रेल्वे सुरक्षा दल (RPF) किंवा अन्य कोणतीही प्रभावी यंत्रणा दिसून येत नसल्याने प्रवाशांमध्ये तीव्र असंतोष आहे. “आपण एखाद्या मोठ्या दुर्घटनेची वाट पाहतोय का?” असा सवाल प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे.
व्हिडीओखाली प्रवाशांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. “हा रोजचा प्रकार झाला आहे”, “अपघात झाल्यावरच प्रशासन जागं होणार का?”, “शेवटच्या क्षणी प्लॅटफॉर्म बदल जाहीर करण्याचं कारण काय?” असे प्रश्न वारंवार विचारले जात आहेत. कुमार साकेत नावाच्या एका युजरने पश्चिम रेल्वेला थेट टॅग करत, “लोक रूळांवरून पळत आहेत, ही परिस्थिती अतिशय गंभीर आहे. प्रशासन काही ठोस पावले उचलणार आहे की अपघाताची वाट पाहतोय?” अशी स्पष्ट टीका केली आहे.
पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून सहावा मार्ग पूर्ण झाल्यानंतर भविष्यात गर्दी कमी होईल, असे आश्वासन देण्यात येत आहे. मात्र सध्या सुरू असलेल्या कामाच्या काळात प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी प्रभावी नियोजन, गर्दी नियंत्रण आणि स्पष्ट सूचना देणे आवश्यक असल्याचे प्रवासी आणि तज्ज्ञांचे मत आहे.
मुंबईत याआधीही गर्दीमुळे अनेक दुर्घटना घडल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर अंधेरी स्थानकावरील सध्याची परिस्थिती केवळ गैरसोयीची नसून संभाव्य धोक्याची घंटा असल्याचे चित्र आहे. वेळेत उपाययोजना न केल्यास एखादी दुर्दैवी घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात असून, प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.


