मुंबई प्रतिनिधी
रेशन कार्डधारकांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली असून, केंद्र सरकारने शिधापत्रिकेसाठी ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया अनिवार्य केली आहे. नव्या नियमानुसार, प्रत्येक रेशन कार्डधारकाला दर पाच वर्षांनी ई-केवायसी पूर्ण करणे बंधनकारक राहणार आहे. ही प्रक्रिया पूर्ण न केल्यास मोफत किंवा अनुदानित रेशनचा लाभ बंद होण्याची शक्यता आहे.
राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना अत्यल्प दरात धान्य पुरवठा केला जातो. याशिवाय रेशन कार्डचा वापर ओळख व रहिवासी पुरावा म्हणून विविध शासकीय कामांमध्ये केला जातो. मात्र, अपात्र व्यक्तींची नावे, मयत लाभार्थी आणि दुबार नोंदी आढळून आल्यामुळे या योजनेत मोठ्या प्रमाणावर अनियमितता वाढल्याचे निदर्शनास आले आहे.
या पार्श्वभूमीवर, केंद्र व राज्य सरकारने रेशन कार्ड प्रणाली अधिक पारदर्शक करण्यासाठी ई-केवायसी सक्तीची करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे, सन २०१३ च्या सुमारास एकदा केवायसी पूर्ण केलेल्या लाभार्थ्यांनाही आता पुन्हा रेशन कार्ड अद्ययावत करणे आवश्यक आहे.
सरकारच्या मते, या निर्णयामुळे बनावट लाभार्थी, अपात्र व्यक्ती आणि दुबार नोंदी वगळण्यास मदत होणार आहे. दिलासादायक बाब म्हणजे, डिजिटल सुविधांमुळे ही प्रक्रिया आता अधिक सुलभ करण्यात आली असून, बहुतांश नागरिकांना मोबाईलद्वारे घरबसल्या ई-केवायसी करता येणार आहे.
ई-केवायसीची प्रक्रिया
मोबाईलद्वारे ई-केवायसी करण्यासाठी ‘मेरा रेशन’ आणि ‘आधार फेसआरडी’ ही दोन ॲप्लिकेशन्स डाउनलोड करावी लागतात. ‘मेरा रेशन’ ॲप उघडल्यानंतर राज्य व जिल्हा निवडून आधार क्रमांक, कॅप्चा आणि ओटीपी टाकावा लागतो. त्यानंतर आधारशी संबंधित माहिती स्क्रीनवर दिसते. पुढील टप्प्यात फेस ई-केवायसीचा पर्याय निवडून मोबाईलच्या सेल्फी कॅमेऱ्याद्वारे चेहरा स्कॅन करावा लागतो. ही प्रक्रिया यशस्वी झाल्यानंतर ई-केवायसी पूर्ण होते.
ई-केवायसी झाली आहे की नाही, हे तपासण्यासाठी ‘मेरा रेशन’ किंवा ‘मेरा केवायसी’ ॲपमध्ये लॉगिन करून स्थिती पाहता येते. स्टेटस ‘Y’ असल्यास प्रक्रिया पूर्ण झाल्याचे समजावे, तर ‘N’ असल्यास ई-केवायसी अद्याप प्रलंबित आहे.
ऑनलाइन पद्धतीने ई-केवायसी करणे शक्य नसलेल्या नागरिकांनी जवळच्या रेशन दुकानात किंवा कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) येथे आधार कार्ड व रेशन कार्डासह प्रत्यक्ष उपस्थित राहून ही प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. ठरवून दिलेल्या मुदतीत ई-केवायसी न केल्यास रेशनचा लाभ गमावण्याची शक्यता असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.


