मुंबई प्रतिनिधी
महाराष्ट्र पोलिस दलाच्या इतिहासात महत्त्वाचा टप्पा ठरलेल्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी ३७.५ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर शनिवारी सेवानिवृत्ती स्वीकारली. या निमित्ताने मुंबईतील नायगाव पोलीस परेड मैदानावर भव्य परेड आणि गार्ड ऑफ ऑनरद्वारे त्यांना सन्मानपूर्वक निरोप देण्यात आला. या कार्यक्रमास वरिष्ठ पोलीस अधिकारी, तसेच नवे पोलीस महासंचालक सदानंद दाते उपस्थित होते.

१९८८ बॅचच्या आयपीएस अधिकारी असलेल्या रश्मी शुक्ला यांनी महाराष्ट्र पोलिसांचे नेतृत्व करत इतिहास घडवला. प्रशासकीय काटेकोरपणा, क्षेत्रीय अनुभव आणि निर्णयक्षमता यांचा संगम त्यांच्या कार्यकाळात दिसून आला. राज्यातील कायदा-सुव्यवस्थेची जबाबदारी सांभाळताना त्यांनी संवेदनशील प्रश्न, मोठे सण-उत्सव, तसेच निवडणुकांच्या काळातील आव्हाने यशस्वीपणे हाताळली.
कारकिर्दीत काही वादही त्यांच्या वाट्याला आले. फोन टॅपिंग प्रकरणामुळे त्यांच्याभोवती राजकीय आणि प्रशासकीय चर्चेचे वर्तुळ निर्माण झाले होते. मात्र, सरकार बदलल्यानंतर संबंधित प्रकरणे मागे घेण्यात आली. विधानसभा निवडणुकांच्या काळात निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार त्यांची बदली करण्यात आली होती; परंतु भाजप सरकार सत्तेत आल्यानंतर त्यांची पुन्हा महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली. या निर्णयामुळे त्यांच्या अनुभवाचा लाभ राज्याला पुन्हा मिळाला.

निरोप समारंभात बोलताना शुक्ला यांनी ३७.५ वर्षांची सेवा पूर्ण करणे हा स्वतःसाठी सन्मान असल्याची भावना व्यक्त केली. त्यांच्या कार्यकाळात राज्यातील कायदा-सुव्यवस्था स्थिर राहिल्याचे त्यांनी नमूद केले. मोठे धार्मिक सण, सार्वजनिक कार्यक्रम आणि निवडणुका शांततेत पार पडल्या, याचा उल्लेख करत त्यांनी पोलिस दलाच्या व्यावसायिकतेचे कौतुक केले.
नक्षलप्रभावित गडचिरोली, गोंदिया यांसारख्या भागांतील परिस्थितीत लक्षणीय सुधारणा झाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. गेल्या काही वर्षांत नक्षली कारवायांमध्ये घट झाली असून सुरक्षा दलांच्या संयुक्त कारवाईमुळे नागरिकांमध्ये विश्वास वाढल्याचे त्यांनी सांगितले.
आपली कामगिरी वैयक्तिक नसून संपूर्ण पोलिस दलाच्या एकत्रित प्रयत्नांचे फलित असल्याचे अधोरेखित करत त्यांनी अधिकारी व जवानांचे आभार मानले. “पोलिस दल हे संघभावनेवर चालते. प्रत्येक यशामागे हजारो हातांची मेहनत असते,” असे त्या म्हणाल्या.
रश्मी शुक्ला यांच्या सेवानिवृत्तीसह महाराष्ट्र पोलिस दलाच्या एका महत्त्वाच्या अध्यायाचा समारोप झाला असून, त्यांच्या कार्यकाळाने महिला नेतृत्वाच्या दृष्टीने नवा मानदंड निर्माण केला, अशी भावना या वेळी उपस्थित अधिकाऱ्यांतून व्यक्त होत होती.


