मुंबई प्रतिनिधी
ड्रायव्हिंग लायसन्स २०२६ मध्ये संपत असेल, तर वाहनधारकांसाठी दिलासादायक बातमी आहे. ड्रायव्हिंग लायसन्स नूतनीकरणाची प्रक्रिया आता अधिक सुलभ करण्यात आली असून, बहुतांश कामे घरबसल्या ऑनलाइन करता येणार आहेत. त्यामुळे आरटीओच्या हेलपाट्यांपासून वाहनचालकांची मोठ्या प्रमाणात सुटका होणार आहे.
ड्रायव्हिंगसाठी वैध लायसन्स असणे कायद्याने बंधनकारक असल्याने वेळेत नूतनीकरण करणे अत्यावश्यक आहे. केंद्र सरकारच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने (MoRTH) ही प्रक्रिया डिजिटल केल्याने पारदर्शकता आणि सोयीसुविधा वाढल्या आहेत.
ड्रायव्हिंग लायसन्सची वैधता किती?
खाजगी (नॉन-ट्रान्सपोर्ट) ड्रायव्हिंग लायसन्स साधारणपणे जारी केलेल्या तारखेपासून २० वर्षे किंवा वाहनधारकाचे वय ४० ते ५० वर्षे होईपर्यंत वैध असते. मात्र व्यावसायिक (ट्रान्सपोर्ट) लायसन्सचे नूतनीकरण दर ३ ते ५ वर्षांनी करावे लागते.
लायसन्स संपण्यापूर्वी एक वर्ष आधीपासून नूतनीकरणासाठी अर्ज करता येतो. परवाना संपल्यानंतर ३० दिवसांचा वाढीव कालावधी दिला जातो; या काळात कोणताही दंड आकारला जात नाही. मात्र त्यानंतर विलंब झाल्यास दंड भरावा लागतो. पाच वर्षांपेक्षा जास्त कालावधीसाठी लायसन्स कालबाह्य झाल्यास नवीन लायसन्स काढणे किंवा पुन्हा चाचणी देणे आवश्यक ठरते.
घरबसल्या ऑनलाइन नूतनीकरण कसे कराल?
ड्रायव्हिंग लायसन्स नूतनीकरणासाठी ‘सारथी परिवहन’ हे अधिकृत पोर्टल वापरले जाते. वाहनधारकांनी sarathi.parivahan.gov.in या संकेतस्थळाला भेट देऊन राज्य निवडावे. त्यानंतर ड्रायव्हिंग लायसन्स विभागात जाऊन ‘Renewal of DL’ या पर्यायावर क्लिक करावे.
येथे डीएल क्रमांक, जन्मतारीख आणि कॅप्चा भरल्यानंतर अर्जाची प्रक्रिया सुरू होते. ओळखपत्र, पत्त्याचा पुरावा, फोटो आणि स्वाक्षरी अशी आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागतात. शुल्काचा भरणा UPI, नेट बँकिंग किंवा डेबिट-क्रेडिट कार्डद्वारे करता येतो.
जर बायोमेट्रिक किंवा प्रत्यक्ष कागदपत्र पडताळणी आवश्यक असेल, तर जवळच्या आरटीओसाठी अपॉइंटमेंट घ्यावी लागते. अर्ज क्रमांकाच्या आधारे नूतनीकरणाची स्थिती ऑनलाइन ट्रॅक करता येते. नूतनीकरण केलेले स्मार्ट डीएल कार्ड साधारण १५ ते ३० दिवसांत पोस्टाने पत्त्यावर पाठवले जाते.
ऑफलाइन नूतनीकरणाचाही पर्याय
ज्यांना ऑनलाइन प्रक्रिया सोयीची वाटत नाही, त्यांच्यासाठी आरटीओमध्ये प्रत्यक्ष जाऊन नूतनीकरण करण्याचाही पर्याय उपलब्ध आहे. यासाठी फॉर्म क्रमांक ९ आणि आवश्यक वैद्यकीय प्रमाणपत्र भरून कागदपत्रांसह सादर करावे लागतात. शुल्क भरल्यानंतर काही दिवसांत नूतनीकरण केलेला परवाना टपालाने मिळतो.
दरम्यान, वाहनधारकांनी आपला डिजिटल ड्रायव्हिंग लायसन्स ‘डिजिलॉकर’ किंवा ‘एम-परिवहन’ अॅपमध्ये ठेवावा, असा सल्ला प्रशासनाकडून देण्यात आला आहे. वाहतूक पोलिसांच्या तपासणीदरम्यान हा डिजिटल डीएल वैध मानला जातो. वेळेत अर्ज करून दंड टाळावा आणि नूतनीकरणाची स्थिती पोर्टलवरून नियमितपणे तपासावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.


