मुंबई प्रतिनिधी
मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंच्या युतीचे राजकीय गणित प्रत्यक्षात उतरताना दिसत आहे. धारावीतील शिवसेना (ठाकरे) पक्षाचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या प्रभागात यंदा शिवसेना–मनसे युतीचा अनोखा प्रयोग पाहायला मिळणार आहे. जागावाटपानुसार हा प्रभाग मनसेच्या वाट्याला गेल्यानंतरही, स्थानिक शिवसेना कार्यकर्त्यांची दखल घेत मनसेने मोठे मन दाखवत शिवसेना शाखाप्रमुखांच्या आईला उमेदवारी दिली आहे.
प्रभाग क्रमांक १८३ हा गेल्या निवडणुकीत शिवसेनेचा मजबूत गड राहिला आहे. मागील महापालिका निवडणुकीत कटके कुटुंबातील उर्मिला कटके यांचा अवघ्या ३६ मतांनी पराभव झाला होता. यावेळीही सतीश कटके यांनाच उमेदवारी मिळावी, अशी स्थानिक कार्यकर्त्यांची मागणी होती. मात्र, युतीतील जागावाटपात हा प्रभाग मनसेकडे गेल्यानंतरही मनसेने कटके कुटुंबालाच उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला.
यानुसार, माजी नगरसेविका पारूबाई कटके यांनी मनसेत प्रवेश करत या प्रभागातून उमेदवारी स्वीकारली आहे. विशेष म्हणजे, सतीश कटके यांचे आई-वडील याच प्रभागातून यापूर्वी नगरसेवक म्हणून निवडून आले होते. त्यामुळे हा प्रभाग कटके कुटुंबासाठी परिचित मानला जातो.
या लढतीत शिवसेना (शिंदे गट) कडून माजी खासदार राहुल शेवाळे यांच्या वहिनी आणि माजी नगरसेविका वैशाली शेवाळे, तर काँग्रेसकडून माजी नगरसेवक दीपक काळे यांच्या पत्नी आशा काळे मैदानात आहेत. तिन्ही उमेदवार या माजी नगरसेवक असल्याने प्रभागातील निवडणूक चुरशीची होण्याची चिन्हे आहेत.
ठाकरे बंधूंच्या युतीमुळे धारावीत शिवसेना–मनसे युतीचा हा अनोखा प्रयोग मतदारांसमोर येत असून, या लढतीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.


