सातारा प्रतिनिधी
राज्यातील नगरपालिकांच्या निवडणुकांत बहुतांश ठिकाणी नगराध्यक्षपदे कमी फरकाने जिंकली जात असताना साताऱ्यात मात्र मताधिक्याचा नवा विक्रम नोंदवला गेला. सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपचे अमोल उदयसिंह मोहिते यांनी तब्बल ४२ हजार ३२ मतांच्या फरकाने विजय मिळवत राज्यातील सर्वाधिक मताधिक्याचा मान पटकावला आहे.
राज्यात भाजप, शिवसेना आणि अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसला घवघवीत यश मिळाले असून भाजप १२९ नगराध्यक्षांसह सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. अनेक ठिकाणी २ ते ५ हजार मतांच्या फरकाने निकाल लागले असतानाच साताऱ्यातील निकाल विशेष ठरला. यापूर्वी कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथे शाहू विकास आघाडीच्या सविता माने यांनी ७,५९० मतांचे मताधिक्य मिळवत लक्ष वेधले होते. मात्र साताऱ्यातील भाजपचा विजय त्याहून कितीतरी पटीने मोठा ठरला.
सातारा नगरपालिकेच्या लढतीत अमोल मोहिते यांना ५७,५८७ मते मिळाली, तर महाविकास आघाडीच्या सुवर्णा पाटील यांना १५,५५५ मते मिळाली. या फरकामुळे नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत आजवरचा विक्रम मोडला गेला. खासदार उदयनराजे भोसले आणि मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांची राजकीय ताकद या निकालातून पुन्हा एकदा अधोरेखित झाल्याचे मानले जात आहे.
दरम्यान, अपक्ष उमेदवार अभिजीत बिचुकले यांना लक्षणीय मते मिळाली असली तरी त्यांचे अनामत रक्कम जप्त झाली. सातारा जिल्ह्यातील बहुतांश नगरपालिकांमध्ये भाजपचे वर्चस्व स्पष्टपणे दिसून आले.
फलटणमध्येही भाजपचा धक्का
फलटण नगरपरिषदेत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते रामराजे नाईक निंबाळकर आणि भाजपचे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यातील पारंपरिक संघर्ष पुन्हा एकदा रंगला. भाजपचे उमेदवार समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी विजय मिळवत रामराजेंच्या सत्तेला धक्का दिला. शिंदेसेनेच्या उमेदवार अनिकेतराजे नाईक निंबाळकर यांचा पराभव झाला.
इतर निकालांचा आढावा
वाई नगरपरिषदेत भाजपचे अनिल सावंत विजयी झाले, तर रहिमतपूरमध्ये भाजपच्या वैशाली निलेश माने यांनी नगराध्यक्षपद पटकावले. मलकापूरमध्ये तेजस सोनवले, मेढा नगरपंचायतीत रूपाली वरखडे, तर म्हसवड नगरपरिषदेतही भाजपचा विजय नोंदवला गेला.
पाचगणी नगरपालिकेत राष्ट्रवादी (अजित पवार गट) पुरस्कृत दिलीप बगाडे अवघ्या दोन मतांनी विजयी झाले असून फेरमतमोजणीची मागणी करण्यात आली आहे. महाबळेश्वर नगरपालिकेत राष्ट्रवादीचे सुनील शिंदे यांनी १,४५१ मतांच्या फरकाने विजय मिळवला.
एकूणच सातारा जिल्ह्यातील निकालांतून भाजपचे प्राबल्य अधोरेखित झाले असून, अमोल मोहितेंच्या विक्रमी विजयामुळे राज्यातील नगराध्यक्षपदाच्या राजकारणात साताऱ्याचे नाव ठळकपणे पुढे आले आहे.


