
सातारा प्रतिनिधी
सातारा : बचत, काटकसर आणि नियोजनाच्या बळावर अजिंक्यतारा साखर कारखाना प्रगतीच्या वाटेवर असल्याचे प्रतिपादन कारखान्याचे मार्गदर्शक संचालक व सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले. ‘‘शेतकरी हित जोपासण्यात अजिंक्यतारा कायम अग्रेसर राहील,’’ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
शेंद्रे (ता. सातारा) येथील स्व. अभयसिंहराजे भोसले सांस्कृतिक हॉल येथे झालेल्या ४३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. या वेळी चेअरमन यशवंत साळुंखे, उपाध्यक्ष नामदेव सावंत, कार्यकारी संचालक जिवाजी मोहिते यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
कारखान्याने गत हंगामात ऊसाला ३२०० रुपये प्रतिटन दिल्यानंतर यंदाच्या दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना प्रतिटन १०० रुपये हप्ता जाहीर केला. कामगारांना १९ टक्के बोनस जाहीर करण्यात आला. कमी क्षेत्रात उच्चांकी उत्पादन घेणाऱ्या आणि कारखान्यास विक्रमी ऊस पुरवणाऱ्या शेतकऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, ‘‘अतिवृष्टीमुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. मराठवाडा व राज्यातील पुरग्रस्त शेतकऱ्यांना तातडीची मदत मिळावी, यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. मी पालकमंत्री असलेल्या लातूर जिल्ह्यात २४४ कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे. साताऱ्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठीही ठोस पाठपुरावा करणार आहे.
सामाजिक बांधिलकी जपत अजिंक्यतारा कारखान्याने पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीस १० लाखांची मदत केली. त्याचा धनादेश संचालक मंडळाने शिवेंद्रसिंहराजेंकडे सुपूर्त केला. सभासदांनी टाळ्यांच्या गजरात या निर्णयाचे स्वागत केले.
सभा कार्यकारी संचालक मोहिते यांनी विषयांचे वाचन करून पार पडली. उपाध्यक्ष सावंत यांनी सूत्रसंचालन केले, तर माजी उपाध्यक्ष विश्वास शेडगे यांनी आभार मानले.