
सातारा प्रतिनिधी
साताऱ्यात पोलिसांसाठीचे नवीन घरकुल प्रकल्प अखेर दिवाळीत वाटपाच्या टप्प्यावर येणार असून ६९३ सदनिकांची सोडत काढण्यात येणार आहे. पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी रविवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. गेल्या दीड वर्षांपासून तांत्रिक कारणांमुळे हा प्रकल्प रखडला होता. महाराष्ट्र पोलीस हाऊसिंग बोर्डामार्फत उभारलेल्या या इमारतींमध्ये साडेपाचशे चौरस फुटांच्या सदनिका असून, वितरण सोडत पद्धतीने होणार आहे. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रकल्पाचे औपचारिक उद्घाटन होणार आहे.
दरम्यान, सातारा जिल्ह्यातील गुन्हे उकल आणि पोलिसांची कामगिरी याबाबत कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी समाधान व्यक्त केले. साताऱ्याचे गुन्हे उकल प्रमाण तब्बल ८० टक्के असून, गहाळ मोबाईल शोधण्यामध्ये जिल्ह्याने शंभर टक्के यश मिळवले आहे. कोल्हापूर परिक्षेत्रात सातारा जिल्हा पोलिस पहिल्या क्रमांकावर असल्याचे त्यांनी नमूद केले.
गणेशोत्सव आणि नवरात्र काळात कायदा व सुव्यवस्था सांभाळण्यात पोलिसांनी चोख कामगिरी केली असून, ध्वनिप्रदूषण करणाऱ्या ३५ मंडळांवर खटले भरण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे फुलारी यांनी सांगितले. नवरात्रातही अशा कारवाया सुरू राहणार आहेत.
सातारा शहरातील वाढत्या अवैध व्यवसायांवर कठोर कारवाई सुरू असल्याचेही पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी स्पष्ट केले. मटका व चक्री जुगाराविरोधात शाहूपुरी पोलिसांना कडक सूचना दिल्याचे त्यांनी सांगितले. “अवैध व्यवसाय दिसल्यास नागरिकांनी थेट पोलिसांना माहिती द्यावी,” असे आवाहनही त्यांनी केले.
महानिरीक्षक सुनील फुलारी यांच्या हस्ते नुकत्याच झालेल्या कर्तव्यपूर्ती मेळाव्यात विशेष कामगिरी करणाऱ्या पोलिसांचा गौरव करण्यात आला. या प्रसंगी अतिरिक्त पोलिस अधीक्षक वैशाली कडूकर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांच्यासह सहा उपविभागीय अधिकारी उपस्थित होते.
दिवाळीपूर्वी सोडतीतून होणाऱ्या या गृहनिर्माण प्रकल्पाच्या वितरणामुळे साताऱ्यातील पोलिसांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.