
मुंबई प्रतिनिधी
मुंबईतील पवई परिसरात धक्कादायक घटना समोर आली आहे. १९ वर्षीय श्रवण विनोद शिंदे या तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन जीवन संपवलं. या घटनेने केवळ त्याच्या कुटुंबीयांचा नाही तर शेजारी राहणाऱ्या दिक्षा दयानंद खळसोडे या १९ वर्षीय मुलीनं
आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
शेवटी पोलिसांच्या धाडसाने तिला वाचवले, परंतु घटनेची गंभीरता लक्षात घेता परिसरातील वातावरण गंभीर आणि चिंताजनक बनले आहे.
घटनेची माहिती
पार्कसाईट पोलीस ठाण्याच्या हद्दीत आयआयटी मार्केटजवळील महात्मा फुले नगर येथे दुपारी साडेदोनच्या सुमारास श्रवणने घरातील लोखंडी अँगलला साडीच्या सहाय्याने गळफास घेतला. त्याला तातडीने राजावाडी रुग्णालयात दाखल केले गेले; परंतु उपचारादरम्यान साडेतीन वाजता त्याला मृत घोषित करण्यात आले.
श्रवणच्या मृत्यूनंतर शेजारी राहणाऱ्या दिक्षानेही टोकाचं पाऊल उचलण्याचा प्रयत्न केला. प्राथमिक माहितीनुसार, श्रवणसोबत तिचे प्रेमसंबंध होते. तरुणाच्या मृत्यूनंतर तिच्यावर घरच्या सदस्यांनी आरोप केल्याने ती घाबरली आणि गळफास घेण्याचा निर्णय घेतला. पण बीट मार्शलचे पोलिस हवालदार ठोकळ आणि बीट स्पेशल ससाने योग्य वेळी हस्तक्षेप करून दरवाजा तोडला आणि तिला जीवित वाचवले. सध्या ती राजावाडी रुग्णालयात उपचार घेत आहे.
श्रवणच्या आत्महत्येमागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेने पवई परिसरात शोककळा पसरली असून पोलिस तपास करत आहेत.